बाराशे रूपयांना रेमडिसीवर विक्रीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:56+5:302021-03-23T04:15:56+5:30
सातपूर : कोरोनावरील उपचारासाठी सध्या वापरले जात असलेले रेमडिसीवर हे इंजेक्शन रुग्णाला माफक दरात उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व ...
सातपूर : कोरोनावरील उपचारासाठी सध्या वापरले जात असलेले रेमडिसीवर हे इंजेक्शन रुग्णाला माफक दरात उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी मांडलेल्या संकल्पनेला शहरातील चौदा औषध विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता शहरातील वीस विक्रेत्यांकडून अवघ्या बाराशे रुपयात रेमडिसीवर इंजेक्शन मिळणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांच्या दालनात सोमवारी शहरातील औषध विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अवघ्या बाराशे रुपयात रेमडिसीवर विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सहा औषध विक्रेत्यांनी पुढाकार घेतला होता. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असून, त्यामुळे उपचारासाठी वापरण्यात आलेल्या या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी पुढाकार घेतला आणि ही संकल्पना मांडली. त्याला विक्रेत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्यावर्षी नाशिकमध्ये अशाचप्रकारे कोरोनाचा फैलाव झाल्याने रेमडिसीवरचा काळाबाजार झाला होता. त्यावेळी दोन हजार तीनशे रुपयांचे इंजेक्शन सहा हजार रुपयांना विकले गेले होते. यावेळी अशी वेळ येऊ नये, यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी थेट औषध उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून आणि औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन रेमडिसीवर इंजेक्शन अवघ्या १,२०० रुपयांना विकण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी सहा आणि आता १४ विक्रेत्यांनी या इंजेक्शनची किरकोळ विक्री १,२०० रुपयांपेक्षा अधिक दराने न करण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोना पॉझिटिव्ह तसेच डॉक्टरांची चिठ्ठी आणि रुग्णाचे आधारकार्ड सादर करुन हे इंजेक्शन मिळू शकते.
चौकट===
रुग्णालयाच्या आवारात असलेल्या औषध दुकानांतूनच औषध खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अशी सक्ती करता येणार नाही, म्हणून फलक लावण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार शहर आणि जिल्ह्यातील एकूण सतरा रुग्णालयांनी आपल्या आवारातील औषधांच्या दुकानाच्या दर्शनी भागात रुग्ण, त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधे घेऊ शकतात, असे फलक लावले आहेत.
(फोटो २२ मेडिसीन) - अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांच्या दालनात आयोजित बैठकीला शहरातील औषध विक्रेते उपस्थित होते.