‘त्या’ लग्नास पोलिसांची उपस्थिती गैरलागू नाही
By admin | Published: June 2, 2017 02:13 AM2017-06-02T02:13:29+5:302017-06-02T02:13:38+5:30
नाशिक : मुस्लीम समाजाचे धर्मगुरू शहर-ए-खतिब हिसामोद्दीन यांच्या पुतण्याच्या लग्न सोहळ्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थितीसंपर्काचा भाग होती
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुस्लीम समाजाचे धर्मगुरू शहर-ए-खतिब हिसामोद्दीन यांच्या पुतण्याच्या लग्न सोहळ्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही केवळ सार्वजनिक संपर्काचा भाग होती. कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम अथवा त्याच्या नातलगाशी त्यांचा कोणत्याही स्वरूपाचा वैयक्तिक संबंध आढळून आलेला नाही, असा निष्कर्ष चौकशी अधिकाऱ्यांनी काढला आहे.
नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात राहाणारे हिसामोद्दीन खतिब यांचे पुतणे शाकीर रजा यांचा विवाह जकी उस्मान कोकणी यांची मुलगी झोया हिच्याशी १९ मे रोजी झाला. या लग्न सोहळ्यास राजकीय नेते, शहरातील व्यापारी, व्यावसायिक व पोलिस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.
मात्र, जकी उस्मानची पत्नी आणि कुख्यात गुन्हेगार दाऊदचा भाऊ इकबाल कासकरची पत्नी दोघी बहिणी आहेत. त्यामुळे दाऊदच्या नातेवाईकाचे लग्न असताना त्यास पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती कशी? असा सवाल उपस्थित करत संशय व्यक्त करण्यात आला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पोलिस उपाआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आपला अहवाल सादर केला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या कामी हिसामोद्दीन खतिब यांचे नेहमीच सहकार्य असते. शिवाय, ते शांतता कमिटीचे सदस्य आहेत. केवळ या सार्वजनिक संपर्कातूनच पोलिस अधिकारी व कर्मचारी या लग्न समारंभास उपस्थित राहिले. खतिब यांच्या पुतण्याचे लग्न नेमके कोणाशी आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते. दाऊदच्या नातलगाशी हे लग्न असल्याचे समजले असते, तर कदाचित पोलिसांनी या विवाह समारंभास जाण्याचे टाळले असते, असे उपायुक्त पाटील यांनी आपल्या चौकशी अहवालात म्हटले आहे.
लग्न सोहळ्यास हजेरी लावलेल्या पोलिसांची दाऊद अथवा त्याचा नातलग जकी उस्मानशी कोणत्याही स्वरुपाचे वैयक्तिक संबंध आढळून आले नाहीत, असा निष्कर्षही चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. शिवाय, नाशिक शहरात कोकणी मुस्लीमांचे सर्वच क्षेत्रात प्राबल्य आहे. त्यामुळे गैर कोकणी (दखनी मुस्लीम) यांच्यात नेहमीच वाद होत असतात. यातूनच लग्नाच्या अनुषंगाने सोशल मीडियातून पोलिसांची बदनामी करण्यात येत असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. ही चौकशी केवळ पोलिसांशी संबंधित असल्याने लग्नास उपस्थित राहिलेल्या राजकीय व्यक्तिंचा उल्लेख करण्यात आलेला नाही.लग्न सोहळ्यास हजेरी लावलेल्या पोलिसांची दाऊद अथवा त्याचा नातलग जकी उस्मानशी कोणत्याही स्वरुपाचे वैयक्तिक संबंध आढळून आले नाहीत, असा निष्कर्षही चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. शिवाय, नाशिक शहरात कोकणी मुस्लीमांचे सर्वच क्षेत्रात प्राबल्य आहे. त्यामुळे गैर कोकणी (दखनी मुस्लीम) यांच्यात वाद होत असतात. यातूनच लग्नाच्या अनुषंगाने सोशल मीडियातून पोलिसांची बदनामी करण्यात येत असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. ही चौकशी केवळ पोलिसांशी संबंधित असल्याने लग्नास उपस्थित राहिलेल्या राजकीय व्यक्तिंचा उल्लेख करण्यात आलेला नाही.