मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंढेंनी नगरसेवकांना केले निरुत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:39 AM2018-07-15T00:39:27+5:302018-07-15T00:41:20+5:30
नाशिक : महापालिकेत रुजू झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमानुसार कामकाज करण्याच्या अवलंबलेल्या धोरणामुळे कोंडी झालेल्या नगरसेवकांनी शनिवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला खरा; मात्र शासनाचे आदेश, नियम आणि धोरण सांगत मुंढे यांनी मंत्र्यांसमक्षच तक्रारकर्त्या नगरसेवकांना निरुत्तर केले. अखेर पालकमंत्र्यांनी त्यावर सामंजस्याची भूमिका घेत मुंबईत बैठक घेऊन साऱ्या प्रश्नांचे निराकरण केले जाईल, असे स्पष्ट केले.
नाशिक : महापालिकेत रुजू झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमानुसार कामकाज करण्याच्या अवलंबलेल्या धोरणामुळे कोंडी झालेल्या नगरसेवकांनी शनिवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला खरा; मात्र शासनाचे आदेश, नियम आणि धोरण सांगत मुंढे यांनी मंत्र्यांसमक्षच तक्रारकर्त्या नगरसेवकांना निरुत्तर केले. अखेर पालकमंत्र्यांनी त्यावर सामंजस्याची भूमिका घेत मुंबईत बैठक घेऊन साऱ्या प्रश्नांचे निराकरण केले जाईल, असे स्पष्ट केले.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील घरपट्टीत तसेच मोकळ्या भूखंडांवरील करआकारणीच्या दरातही वाढ केली आहे. त्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित केली होती. यावेळी करवाढी पाठोपाठ शहरातील १३६ अंगणवाड्या बंद केल्या गेल्याच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्याविषयी तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. यावेळी मुंढे यांनी प्रत्येक तक्रारीला नियम व निकषांच्या अधीन राहत समर्पक उत्तरे दिली. तथापि, आम्ही चाळीस पन्नास हजार लोकांमधून निवडून येतो, त्यांचे उत्तरदायित्व असून, नागरिकांना काय सांगायचे? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित करीत नगरसेवकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या तसेच त्या सोडवणूकीसाठी पालकमत्र्यांना साकडे घातले. महापालिकेत परंपरेने चालत आलेला ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधीच बंद केला गेल्याबाबत, बोलताना आयुक्तांनी कोणतेही काम आवश्यकता, व्यवहार्यता आणि आर्थिक उपलब्धतेवरच केले जात असल्याचे सांगून बहुतांशी नगरसेवकांनी नियमबाह्य पद्धतीने सोसायट्यांच्या ओपन स्पेसवर बांधकामे सुचविल्याकडे लक्ष वेधले.
शहरातील बंद करण्यात आलेल्या अंगणवाड्या पुन्हा सुरू कराव्यात किंवा यातील सेविकांना मनपाच्या सेवेत अन्य विभागांत सामावून घ्यावे, या मागणीला प्रत्युत्तर देतांना आयुक्तांनी तसे करता न येण्याबाबतचा शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाचा जीआरच पुढे केला. इतकेच नव्हे तर या कर्मचाºयांना मनपाच्या सेवेत बॅकडोअर एन्ट्री देण्याचा हा प्रकार असून, तो आपण कदापि होऊ देणार नसल्याचे सांगितले. बेकायदेशीर कर्मचारी भरतीबाबत केवळ अधिकाºयांच्या चौकशा होतात. लोकप्रतिनिधींच्या नव्हे असेही त्यांनी यासंदर्भात स्पष्ट केले.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे दर कमी करून त्यांच्याशी करार करण्याबाबतही मुंढे यांनी दरवाढीचा निर्णय महासभेने घेतला आहे, मी तर केवळ त्याची अंमलबाजवणी करीत आहे, असे स्पष्ट करीत नियमानुसार करार न करणाºया गाळेधारकांचे गाळे उद्यापासून सील करू का, असा प्रश्नही केल्याने सभागृह नेते दिनकर पाटील यांनी ‘नाही साहेब, मिटवून घ्या’ असे सांगत तडजोड करण्याची विनंती केली.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात बोलताना आपण नगरसेवक म्हणून काम केले आहे, त्यामुळे नगरसेवकांना काय कामे करावे लागते, हे चांगलेच माहिती असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे त्यांनी आयुक्त आणि नगरसेवक संघर्षावर तोडगा काढू त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंधितांच्या भावना पोहोचवू, असे सांगितले.