जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By admin | Published: May 13, 2015 11:27 PM2015-05-13T23:27:29+5:302015-05-14T00:18:12+5:30
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
नाशिक : जिल्ह्यात येवला, लासलगाव, निफाड, चांदवड, दिंडोरी, सिन्नर, सटाणा या तालुक्यांतील काही गावांमध्ये बुधवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळच्या सुमारास अर्धा तास विजेच्या कडकडाटासह सुसाट वादळी वारे सुटून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. येवल्यात मोठमोठी झाडे उन्मळून पडलीÞ. अचानक आलेल्या या पावसाने शेतकरीवर्गाबरोबर नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. तालुक्यातील सायगावसह पूर्व भागात व परिसरात शेतात पाणी साठले. अनेक घरांचे पत्रे उडाले.
बुधवारी दुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास ईशान्य दिशेकडून जोरदार वादळीवारे वाहू लागले. या वादळी वाऱ्यासह पावसाने शहर व पूर्व भागाला झोडपून काढलेÞ. गेल्या तीन दिवसांपासून कमालीचे ऊन होते. तपमानाने ४२ अंश डिग्री सेल्सिअसचा आकडा गाठला होता. दुपारी तीन वाजता सर्वत्र सोसाट्याचा वारा सुटला. धुळीचे लोट हवेत दिसू लागले. अर्धा तास वादळी वारे आणि त्यानंतर अर्धा तास शहरात मुसळधार पाऊस झाला. साडेतीन वाजता मात्र वाऱ्याचा आणि पावसाचा वेग मंदावला. वाऱ्याच्या या तुफानी वेगामुळे अनेक ठिकाणी डिजिटल फलक फाटून तुकडे तुकडे झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले, तर १० ते १२ झाडे उन्मळून पडलीÞ. (लोकमत ब्युरो)