येवला तालुक्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:19 AM2021-08-18T04:19:58+5:302021-08-18T04:19:58+5:30
जळगाव नेऊर : यावर्षी येवला तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने सुरुवातीला टप्प्याटप्प्याने काही भागात हजेरी लावल्याने खरीप पिकांची पेरणीदेखील त्याचप्रमाणे झालेली ...
जळगाव नेऊर : यावर्षी येवला तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने सुरुवातीला टप्प्याटप्प्याने काही भागात हजेरी लावल्याने खरीप पिकांची पेरणीदेखील त्याचप्रमाणे झालेली होती. दरम्यान, पावसाने गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारली होती. या काळात उन्हाचे चटके जाणवत होते; पण सोमवारी (दि.१७) मघा नक्षत्रात पहिल्याच दिवशी जळगाव नेऊर, जऊळके, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी, सोमठाणे, निळखेडे परिसरात पावसाने हजेरी लावल्याने करपत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा हवालदिल होऊन आभाळाकडे डोळे लावून बसला होता. येवला पश्चिम भागात जळगाव नेऊर परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे खरिपाची पिके तरारली असून, शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
तब्बल वीस दिवसांपासून गायब असलेल्या पावसामुळे पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केलेला खर्च वाया जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, सोमवारी तीन-चार वाजता ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाच वाजेच्या सुमारास पाऊस पडला. यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, मंगळवारी येवला तालुक्याच्या बऱ्याचशा भागात पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
चौकट...
बळीराजाला आधार
येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दिवसा उन्हाचे चटके, तर रात्री गार वारा यामुळे शेतकरी चिंतित होता. सोमवारी तीन -चार वाजता तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मंगळवारी येवला तालुक्याच्या बऱ्याचशा भागात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी १६ ते २४ ऑगस्टदरम्यान नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत दिले होते ते आज खरे ठरत असून त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
(१७ रेन)
जऊळके येथे सोमवारी झालेल्या पावसाने शेतात साचलेले पाणी.