पाटोदा परिसरात पावसाची हजेरी; पिकांना जीवदान, शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:45 PM2020-06-26T17:45:06+5:302020-06-26T17:45:33+5:30
पाटोदा :दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून पाटोदा परिसरात पुनरागमन करीत हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. ठाणगाव, पिंपरी, दहेगाव, कानडी, आडगाव रेपाळ, कातरणी, विखरणी, धुळगाव परिसरात पावसाने हजेरी लावली.
Next
परिसरात रोहिणीच्या पावसाच्या ओलीवर शेतकरीवर्गाने खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. पेरणीनंतरही पावसाने हजेरी लावल्याने पिके जोमदार होती मात्र दहा -अकरा दिवसांपासून परिसरात पावसाने ओढ दिल्याने शेतातील पिके सुकू लागली होती. कर्ज, उसनवारीच्या पैशांवर घेतलेल्या महागड्या बी-बियाणे व खतांचा खर्च वाया जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र योग्यवेळी झालेल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. या पावसाने मका पिकावरील अळी नष्ट होण्यास थोडीफार मदत होणार असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगीतले जात आहे.