बेमोसमी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:22 AM2021-11-18T01:22:42+5:302021-11-18T01:23:02+5:30
मागील चार दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ व दमट वातावरण नागरिकांना अनुभवयास येत होते. कमाल, किमान तापमानात अचानकपणे वाढ झाल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. बुधवारी (दि.१७) दिवसभर नागरिक घामाघूम होत होते. कारण, किमान तापमानाचा पारा थेट २१.८ अंशांपर्यंत जाऊन भिडला होता. अखेर संध्याकाळी शहरासह विविध उपनगरांमध्ये बेमोसमी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला.
नाशिक : मागील चार दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ व दमट वातावरण नागरिकांना अनुभवयास येत होते. कमाल, किमान तापमानात अचानकपणे वाढ झाल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. बुधवारी (दि.१७) दिवसभर नागरिक घामाघूम होत होते. कारण, किमान तापमानाचा पारा थेट २१.८ अंशांपर्यंत जाऊन भिडला होता. अखेर संध्याकाळी शहरासह विविध उपनगरांमध्ये बेमोसमी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वातावरणात अचानकपणे बदल झाला होता. मळभ दाटून येत असल्याने नागरिकांना दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. अचानकपणे शहरातून थंडी गायब झाली आहे. कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने पावसाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी दुपारनंतर काही प्रमाणात वारा सुटला. संध्याकाळी सात वाजेनंतर शहरात पावसाच्या सरींचा वर्षाव झाला. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या पावसाने घरी परतणाऱ्या नोकरदारांना चिंब भिजविले. अचानकपणे आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली.
पावसाने उघडीप देताच वातावरणात गारवा जाणवू लागला हाेता. चार दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नाशिककरांना बेमोसमी पावसाच्या काहीशा वर्षावाने थोडाफार दिलासा मिळाला. शहरात मागील आठवड्यात बोचरी थंडी नाशिककर अनुभवत होते; मात्र या आठवड्याच्या प्रारंभी अचानकपणे वातावरणात बदल झाला होता. बुधवारी कमाल तापमान २९.१ तर किमान तापमानाचा पारा २१.८अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता.
हलका ते मध्यम स्वरुपाच्या झालेल्या पावसानंतर शहरात पुन्हा थंडीचे दमदार आगमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.