शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 05:27 PM2020-04-30T17:27:06+5:302020-04-30T17:30:44+5:30
सध्या लॉकडाउन असल्यामुळे नागरिक आपापल्या घरांमध्येच असल्याने अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने फारशी तारांबळ उडाली नाही. जेलरोड भागात अर्धा तास पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली. यामुळे रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते.
नाशिक : शहराचे कमाल तापमान मागील दोन दिवसांत अचानकपणे वाढले. हवामान खात्याकडून राज्यात वादळी वा-यासह पावसाचा इशारा पुढील तीन दिवसांमध्ये देण्यात आला आहे. गुरुवारी (दि.३०) नाशिक शहरासह काही उपनगरांमध्ये वादळी वाºयासह हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव झाल्यामुळे नाशिककरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्यास मदत झाली. काही भागात पावसासह गारांचाही वर्षाव झाला.
नाशिकच्या वातावरणात अचानकपणे बदल होत असून, गेल्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता कमी झाली होती. तसेच किमान तापमानाचा पाराही खाली आल्याने नाशिककरांना रात्रीच्या उकाड्यापासूनही दिलासा मिळाला होता, मात्र पुन्हा दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानाचा पारा चढू लागला आहे. बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ अंश इतके मोजले गेले होते, तर किमान तापमान २४ अंश इतके नोंदविले गेले होते.
गुरुवारी शहरातील मध्यवर्ती परिसर असलेला मेनरोड, गंजमाळ, जुने नाशिक, शालिमार, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, गोदाघाट या भागांसह जेलरोड, अशोकामार्ग या भागात सोसाट्याच्या वा-यासह सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या या अवकाळी पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी यानंतर पुन्हा उकाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र पावसाच्या शिडकाव्यामुळे नागरिकांना मातीचा सुगंध परिसरात दरवळल्याचा अनुभव ऐन उन्हाळ्यात घेता आला.
सध्या लॉकडाउन असल्यामुळे नागरिक आपापल्या घरांमध्येच असल्याने अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने फारशी तारांबळ उडाली नाही. जेलरोड भागात अर्धा तास पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली. यामुळे रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. तसेच जिल्ह्यातदेखील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतपिकांवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.