नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वीच सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:30 PM2017-12-08T14:30:12+5:302017-12-08T14:30:59+5:30
कार्यक्रम सादर : स्थायी समिती सभेत प्रशासनाला सभापतींनी केली सूचना
नाशिक - दरवर्षी महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्तांनी २० फेबु्रवारीच्या आत स्थायी समितीला सादर करणे बंधनकारक असते. परंतु, फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमुळे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक १७ एप्रिलला सादर करण्यात आले होते. परिणामी, पुढे महासभेवर अंदाजपत्रक सादर करण्यास विलंब झाला होता. त्या पार्श्वभूमीवर, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे आयुक्तांचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वीचस्थायीला सादर करण्याची सूचना सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला केली आहे.
महापालिकेच्या लेखा विभागाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचा कार्यक्रम मान्यतेसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. या कार्यक्रमानुसार, आयुक्तांचे अंदाजपत्रक स्थायीला २५ फेब्रुवारी २०१८ पूर्वी सादर करण्याचे तर स्थायीने महासभेला ३१ मार्च २०१८ पूर्वी सादर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. चालू वर्षी फेबु्रवारीत महापालिकेच्या निवडणुकीमुळे लेखानुदान सादर करण्याच्या प्रक्रियेस विलंब झाल्याने आयुक्तांनी १७ एप्रिलला अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते तर स्थायी समितीने महासभेला २९ मे रोजी अंदाजपत्रक सादर केले होते. परिणामी, अंदाजपत्रकाचा ठराव जाईपर्यंत पार आॅगस्ट महिना उजाडला होता. या साºया पार्श्वभूमीवर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे आयुक्तांचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपुर्वीच सादर करण्याच्या सूचना दिल्या. विद्यमान स्थायी समितीच्या सभापतींची मुदत २८ फेबु्रवारीला संपुष्टात येणार आहे तर नियमानुसार, ८ सदस्य निवृत्त होतील. त्यामुळे, ३१ जानेवारीपूर्वीच अंदाजपत्रक सादर झाल्यास विद्यमान सभापतींना सलग दोन वर्षांचे अंदाजपत्रक तयार करण्याची संधी मिळू शकते.
विविध प्रस्तावांना मान्यता
स्थायी समितीच्या बैठकीत भूसंपादनाच्या काही प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसेच अपंगांसाठी ३ टक्के राखीव निधीतून पॅराआॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ३५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. शिवसेनेचे प्रवीण तिदमे यांनी नवीन वसाहतींचा विस्तार वाढत चालल्याने त्याठिकाणी जलकुंभ उभारण्याची सूचना केली. त्यावर, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी त्यासाठी निधीची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सभापतींनी येत्या अंदाजपत्रकात त्याबाबत तरतूद करण्याचे आश्वासन दिले. डी. जी. सूर्यवंशी यांनी समावेशक आरक्षणांतर्गत वाहनतळांच्या जागा ताब्यात घेण्याची मागणी केली तसेच आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याचीही सूचना केली. तत्पूर्वी, सभेत ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचेसह लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक गणेश धुरी या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.