सध्याची व्यवस्था ही एकलव्यांचे अंगठे मागणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:37+5:302021-08-21T04:18:37+5:30
नाशिक : केवळ शिक्षण व्यवस्थाच नव्हे तर सगळीच व्यवस्था ज्यांच्याकडे साधने आहेत त्यांच्यासाठी अनुकूल आहे. ही संपूर्ण व्यवस्था एकलव्यांचे ...
नाशिक : केवळ शिक्षण व्यवस्थाच नव्हे तर सगळीच व्यवस्था ज्यांच्याकडे साधने आहेत त्यांच्यासाठी अनुकूल आहे. ही संपूर्ण व्यवस्था एकलव्यांचे अंगठे मागणारी असल्याने आपल्यातील प्रत्येकाला या व्यवस्थेत परिवर्तनासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी एकलव्य गौरव पुरस्काराप्रसंगी सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीतून दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मानव अधिकार संवर्धन संघटनतर्फे ‘एकलव्य गौरव पुरस्कार’ दिला जातो. गुरुवारी (दि. १९) तब्बल १९० विद्यार्थ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्रज्ञा दया पवार उपस्थित होत्या. त्यांनी या वेळी बोलताना सांगितले की, तुमच्या प्रयत्नांना, ताकदीला एका दिवसापुरते मर्यादित करू नका. तुमची प्रतिभा कायम ठेवा. तुम्ही इथे आलात म्हणजे एक लढाई पूर्ण केली आहे. आता आपल्याला परिवर्तन आणायचे असून त्यात टिकून राहायचे असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले. त्यानंतर संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत यांच्या काळातील एकलव्य गौरव पुरस्काराचे अनुभव सांगितले.
एकलव्य गौरव पुरस्काराचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव श्यामला चव्हाण यांनी केले. आभार संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद वाघ यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, अभय कांता उपस्थित होते.
--
संस्थेच्या वेबसाइटचे अनावरण
माजी एकलव्य आणि संस्थेच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून बनविण्यात आलेल्या संस्थेच्या वेबसाइटचे अनावरणदेखील या वेळी करण्यात आले. ही वेबसाईट अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी बनवली असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले.
फोटो १९एकलव्य