‘प्रतिबिंब’सह रहस्यमय ‘शू...कुठे बोलायचे नाही’चे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:07 AM2018-12-01T01:07:53+5:302018-12-01T01:08:10+5:30
महानिर्मिती आंतर केंद्र नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात मुंबई कार्यालयातर्फे महेश एलकुंचवार लिखित ‘प्रतिबिंब’ तर दुपारच्या सत्रात उरण वायु विद्युत केंद्राने रत्नाकर मतकरी लिखित ‘शू... कुठं बोलायचे नाही’ या दोन कथांचे रंगमंचावर सादरीकरण केले.
महानिर्मिती राज्य नाट्य स्पर्धा
नाशिक : महानिर्मिती आंतर केंद्र नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात मुंबई कार्यालयातर्फे महेश एलकुंचवार लिखित ‘प्रतिबिंब’ तर दुपारच्या सत्रात उरण वायु विद्युत केंद्राने रत्नाकर मतकरी लिखित ‘शू... कुठं बोलायचे नाही’ या दोन कथांचे रंगमंचावर सादरीकरण केले.
महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये सोमवार पासून सुरू असलेल्या अंतर केंद्र नाट्य स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात मुंबई कार्यालयातर्फे मानवी मनाचा शोध घेणारे ‘प्रतिबिंब’ नाटक सादर करण्यात आले.
या नाटकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. दैनंदिन जीवनात स्वत्व हरवलेल्या तो, ती आणि ते या सर्वांची ही कथा या नाटकांमधून दिग्दर्शक संतोष पुरोहित यांनी रंगमंचावर सादर करण्याचा प्रयत्न केला. या नाटकात मयुरी शिंदे, सचिन मोडकवार, अंजली कुलकर्णी बावटे, दिलीप राजपूूत आदींच्या भूमिका असून, प्रकाशयोजना प्रफुल्ल कुलकर्णी, संगीत नितीन जोगळेकर, रंगभूषा व वेशभूषा गीतांजली झीरमुट यांनी केली होती, तर दुपारच्या सत्रात उरण येथील वायू विद्युत केंद्रातर्फे रत्नाकर मतकरी लिखित ‘शू... कुठं बोलायचे नाही’ नाटकातून दिग्दर्शक अनिल शिंदे यांनी नितिमत्ता शुद्ध आचरण, सुसंस्कृत पणाच्या गप्पा मारणाऱ्यांकडून घडलेली एखादी अयोग्य कृती म्हणजे काहीतरी भयंकर घडलेले आहे असे न भासवता आणि काही घडलेलेच नाही, अशा आविर्भावात वावरताना अशी घटना प्रसंग समाजासमोर येऊ न देण्यासाठी करावी लागणारी धडपड या नाटकातून रंगमंचावर रंगवलेली आहे.
नाटकात अनिल शिंदे, प्रशांत भट, जगन्नाथ कचरे, प्रियांका पाटील, रुपाली चव्हाण, पूनम लामतुरे यांनी भूमिका साकारली असून, नेपथ्य सुनील इंगळे, सागर मार्कं ड यांचे असून, संगीत प्रशांत काकड व धनंजय मंडलिक, प्रकाशयोजना वसंत स्वामी व शीतल टारे यांचे आहे.