सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण
By Suyog.joshi | Published: October 30, 2023 01:38 PM2023-10-30T13:38:46+5:302023-10-30T13:39:38+5:30
खातेप्रमुखांनी त्यावर काम करुन अंतिम आराखडा तयार केला आहे.
नाशिक (सुयोग जोशी) : आगामी सिंहस्थ आराखड्यासाठी सोमवार (दि. ३०) बैठक होणार असून त्यात विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या माहितीवर चर्चा होणार आहे. सिंहस्थ आराखडा करताना त्यातील महत्वाचा कामांना प्राधान्य देत त्रुटी दूर करा अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर सबंधित खातेप्रमुखांनी त्यावर काम करुन अंतिम आराखडा तयार केला आहे.
आयुक्त डाॅ. अशोक करंजकर शुक्रवारीच (दि.२७) त्याबाबत आढावा घेणार होते. पण मुंबई येथे अमृत योजनेच्या बैठकीसाठी तातडीने जावे लागल्याने ही बैठक येत्या सोमवारी होणार आहे. सिंहस्थासाठी नाशिक महापालिका यजमानाच्या भुमिकेत असल्याने त्यांनी ऐनवेळी गोंधळ नको म्हणून प्राथमिक स्तरावर सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. त्यात प्रामुख्याने साधुग्रामसाठी भूसंपादन व रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदी मूलभूत सुविधांसह आरोग्य व वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर सिंहस्थानिमित्त शहरातील बाह्य, अंतर्गत रिंगरोड विकसित केले जाणार आहे. गंगापूर व दारणा धराणातून थेट पाइपलाइन योजनेसह नव्याने विकसीत झालेल्या भागात नवीन जलावाहिन्या टाकणे, अग्निश्मन केद्र, नवीन बंब व अग्निशमन साहित्याची खरेदी केली जाणार आहे.
सिडको व तपोवन येथे रुग्णलय अशा अनेक कामांची जंत्री आहे. सर्व विभागांनी कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवत विविध कामांचे नियोजन केल्याने आराखडा दहा हजार कोटींच्या घरात पोहचला. आयुक्तांनी एक महिन्यापुर्वी आढावा घेतला तेव्हा अत्यावशक कामेच नियोजनात धरा अशी तंबी देत त्रुटी दूर करण्याच्या सूचना सर्व खातेप्रमुखांना दिल्या. त्यानंतर आता सुधारीत आराखडा तयार करण्यात आला असून आजच्या बैठकीत त्याचे आयुक्तांसमोर सादरीकरण केले जाणार आहे.