‘सत्यमेव जयते’कडून नाशिक जिल्हाधिका-यांना सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:58 PM2017-12-06T15:58:13+5:302017-12-06T16:04:36+5:30
नाशिक : अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाऊं डेशनच्या ‘सत्यमेव जयते’ उपक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड व सिन्नर या दोन तालुक्याची निवड करण्यात आल्याने बुधवारी त्याची पहिली प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या समन्वयकांकडून या उपक्रमाची माहिती तसेच प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात येऊन डिसेंबरच्या अखेरीस दोन्ही तालुक्यांमध्ये फाऊंडेशनच्यावतीने प्रदर्शन भरविण्याचे जाहीर करण्यात आले.
महाराष्टÑातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून कामे केली जात असून, त्यात प्रामुख्याने जलसंधारण व मृद संधारणाच्या कामांचा समावेश आहे. यंदा राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींकडून कामे करवून घेण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे व त्यासाठी त्यांनी ‘वाटर कप’ स्पर्धा भरविली आहे या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर या नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यांची निवड केली आहे. बुधवारी पाणी फाऊंडेशनचे राज्याचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ व त्यांच्या सहकाºयांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांची भेट घेऊन सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने फाऊंडेशनचा उद्देश विषद करणारे ‘दुष्काळाशी दोन हात’ तसेच गेल्या वर्षी राज्यात पहिले आलेल्या ‘वेळू’ गावात केलेल्या जलसंधारण, मृदसंधारण कामांचे सादरीकरण केले.
वॉटर कप स्पर्धेबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. त्यासाठी दि. २८ व २९ डिसेंबर रोजी चांदवड येथे दोन दिवस फाऊंडेशनच्यावतीने प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात आजवर केलेल्या कामांची माहिती, कामे करण्याच्या पद्धती, ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना माहिती देण्यात येईल हेच प्रदर्शन ३० व ३१ डिसेंबर रोजी सिन्नर येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी येणाºया ग्रामपंचायतींना त्याच ठिकाणी फाऊंडेशनच्या वतीने अर्ज वाटप करण्यात येणार असून, साधारणत: १० जानेवारी पर्यंत ग्रामपंचायतींनी अर्ज भरून सादर करणे बंधनकारक आहे. ३१ जानेवारीपर्यंत सदर ग्रामपंचायतींच्या सहभागाविषयी निश्चितीकरण करण्यावर विचार करण्यात येईल व त्यानंतर ग्रामपंचायतींनी गावाच्या कामांचा आराखडा तयार करून तो फाऊंडेशनला सादर करणे अपेक्षितअसल्याचे यावेळी फाऊंडेशनच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी प्रांत अधिकारी महेश पाटील, वासंती माळी, सिन्नर व चांदवडचे तहसिलदार, कृषी अधिकारी, वन संरक्षक, पंचायत समित्यांचे उप अभियंते आदी उपस्थित होते.