अध्यक्षपद खुले झाल्याने सर्वपक्षीयांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 08:10 PM2019-11-19T20:10:42+5:302019-11-19T20:15:16+5:30
नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २००६ नंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुले झाले असून, त्यावेळी पंढरीनाथ थोरे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर मात्र सलग चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले. यंदा तेरा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आगामी अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या असून, त्यातल्या त्यात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेत इच्छुकांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. राज्यात संभाव्य महाशिव आघाडीचा सुरू असलेल्या प्रयोगाचा विचार करता, सेनेकडून बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर असली तरी, विद्यमान अध्यक्षदेखील या पदावर पुन्हा दावा करू शकतात.
नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २००६ नंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुले झाले असून, त्यावेळी पंढरीनाथ थोरे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर मात्र सलग चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले. यंदा तेरा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजता या आरक्षणाची माहिती जिल्हा परिषदेत येऊन धडकताच इच्छुकांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्या शिवसेनेची असून, त्याखालोखाल राष्टÑवादी व भाजपची आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सेना व भाजपमध्ये झालेला दुरावा तसेच कॉँग्रेस, राष्टÑवादीची सेनेशी होत असलेले सख्य पाहता राज्यात महाशिव आघाडी अस्तित्वात आल्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहील व राष्टÑवादी, कॉँग्रेसकडे उपाध्यक्षपद तसेच सभापतिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याचीही शक्यता असून, त्यासाठी आगामी काळात राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सेनेतच इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या असून, बाळासाहेब क्षीरसागर, सुरेखा दराडे यांच्या नावांची चर्चा होत असली तरी, सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद खुले झाल्याने या पदासाठी कोणत्याही प्रवर्गातील सदस्य दावा करू शकतो. त्यामुळे भास्कर गावित या आदिवासी सदस्याच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. गेल्या अडीच वर्षांतील कार्यकाळातील जवळपास वर्षभर विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमध्येच वाया गेल्याने व उर्वरित काळात जिल्हा परिषदेचा गाडा चांगला हाकल्यामुळे विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे यांना पक्षश्रेष्ठींनी ठरविले तर पुन्हा संधी मिळण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. शिवसेनेला एकट्याच्या बळावर अध्यक्षपद मिळणे अशक्य असल्यामुळे महाशिव आघाडीचा प्रयोग झाल्यास विषय समित्यांच्या सभापतिपदासाठीही सेनेच्या इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.