महामंडळाचे अध्यक्ष घेणार स्वागताध्यक्षांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:38 AM2021-02-20T04:38:30+5:302021-02-20T04:38:30+5:30
नाशिक : साहित्य संमेलनाच्या घोषणेपासून महिनाभराहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील येत्या ...
नाशिक : साहित्य संमेलनाच्या घोषणेपासून महिनाभराहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील येत्या रविवारी (दि.२१) नाशिकला येणार असून स्वागताध्यक्षांची भेट घेणार आहेत. अध्यक्षांना सांगण्यात आलेले कार्यक्रम स्थळच बदलण्यात आल्यापासून काही राजकारण्यांना पदांची खिरापत वाटल्याबाबतची चर्चा महामंडळापर्यंत पोहोचल्याने नाशिक दौऱ्यावर आलेले अध्यक्ष काय भूमिका घेतात, याचीच आयोजकांना चिंता पडली आहे.
साहित्य संमेलनाच्या आयोजनाला आता अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने संमेलनाच्या आयोजनात कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी अध्यक्ष ठाले पाटील रविवारी स्वत: नाशिकला येणार आहेत. संमेलनाची संपूर्ण जबाबदारी ही अंतिमत: साहित्य महामंडळाची असते. त्यामुळे संमेलनाच्या रूपरेषेपासून नियोजन, आखणी आदी सर्व बाबींवर महामंडळाच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची बारीक नजर असते. संमेलनातील परिसंवाद, चर्चासत्रे, निमंत्रितांची कविसंमेलने याबाबतचे बहुतांश अधिकार हे महामंडळाकडेच असतात. त्यामुळे निर्धारित केल्यानुसारच सारे काही घडत आहे किंवा नाही त्याबाबतदेखील महामंडळाला दक्ष राहावे लागते. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय काही ज्येष्ठ साहित्यिकांना साहित्य महामंडळाकडून निमंत्रण देण्याचीदेखील प्रथा आहे. त्याची व्यवस्था पाहण्याचे काम यजमान संस्थेकडून होत असते. अशा परिस्थितीत कौतिकराव ठाले पाटील हे २१ फेब्रुवारीला येत असून त्यामुळे आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष काय सांगणार, याचीच चर्चा आयोजनाच्या कार्यालयात रंगली आहे.
इन्फो
स्थळबदलाबाबतही होणार चर्चा
साहित्य संमेलनासाठी प्रारंभी गोएसो कॅम्पसमधील इंजिनिअरिंग कॉलेजचे स्थळ आणि नकाशे दाखविण्यात आले होते. मात्र, आता ऐनवेळी गोएसोमधील क्रिकेट ग्राऊंडवर मुख्य सोहळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ऐनवेळी करण्यात आलेला स्थळ बदल आणि खिरापतींप्रमाणे वाटण्यात आलेली पदे याबाबत अध्यक्ष ठाले पाटील आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.