चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती, पोलीसपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:09 AM2020-08-15T01:09:55+5:302020-08-15T01:10:49+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. १४) पोलीसपदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीसपदक, १४ पोलीस शौर्यपदक व ३९ जणांना प्रशंसनीय सेवेकरिता पोलीसपदक जाहीर झाले आहे.
नाशिक : स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. १४) पोलीसपदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीसपदक, १४ पोलीस शौर्यपदक व ३९ जणांना प्रशंसनीय सेवेकरिता पोलीसपदक जाहीर झाले आहे.
पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय लोंढे व नागरी हक्क संरक्षण कार्यालय परिक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक श्याम वेताळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांना राष्ट्रपती पोलीसपदक जाहीर झाले आहे. शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे मूळचे लोणी हवेली (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील आहेत. डॉ. कोल्हे यांना २८ वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत सुमारे ६०० बक्षिसे ८५ प्रशंसापत्रे मिळाली असून, महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे.
नागरी हक्क संरक्षण कार्यालय नाशिक परिक्षेत्र येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक श्याम गणपत वेताळ यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रपती पोलीसपदक जाहीर झाले आहे. ते मूळचे पाटणे (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील आहेत. यापूर्वी ते नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वाचक शाखेत कार्यरत होते.