अध्यक्षपदाच्या हट्टापायी पक्ष दावणीला
By admin | Published: March 23, 2017 01:41 AM2017-03-23T01:41:44+5:302017-03-23T01:41:55+5:30
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांना जिव्हारी लागला आहे.
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांना जिव्हारी लागला असून, अध्यक्षपदाच्या ईर्षेपोटी एका नेत्याने पक्ष दावणीला बांधल्याचा आरोप आता राष्ट्रवादीच्या सदस्यांमधून करण्यात येत आहे.
मंगळवारी झालेल्या भाजपा-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एकत्रित बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या तब्बल १५ ते १६ सदस्यांनी संबंधित माजी आमदाराच्या हेकेखोरपणाबद्दल आपली उघड उघड नाराजी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. असे असले तरी अधिकृतपणे बोलण्यास कोणीही सदस्य तयार नसून याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्याचे समजते. खायचे तर तुपाशी नाही तर उपाशी, या उक्तीनुसार पाहिजे तर अध्यक्षपद अन्यथा काही नाही, या उक्तीनुसार पक्षाची वाटचाल जिल्हा परिषद निवडणुकीत झाली. वास्तविक निवडून आलेल्या १८ सदस्यांची मते जाणून त्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते, अशी कुजबूज आता नवनिर्वाचित सदस्यांमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांचा ओढा पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेसोबत जाण्याचा असताना सदस्यांची मते विचारात न घेताच भाजपाबरोेबर जाण्याचा निर्णय घेऊन पक्षाला वीस वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याचा आरोप आता काही सदस्य खासगीत बोलताना करीत आहेत. पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव तसेच श्रीराम शेटे यांनी यासंदर्भात वरिष्ठांपर्यंत भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. या बैठकीस भाजपाचे १५ व एक सहयोगी तसेच राष्ट्रवादीचे १८ व एक सहयोगी असे एकूण ३५ सदस्य उपस्थित असल्याचे कळते. (प्रतिनिधी)