रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 08:56 AM2018-05-09T08:56:13+5:302018-05-09T08:56:13+5:30
बिपीन गांधी यांना 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' पाहताच आली नाही
नाशिक: रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालंय. रेल्वे प्रवाशांसाठी झटणाऱ्या बिपीन गांधी यांनी 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र ही एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात येण्याच्या पाच मिनिटं आधीच बिपीन गांधी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस'ची निर्मिती करण्यात आली. पंचवटीच्या २२ नवीन बोगींची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत करण्यात आली. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या बोगींची निर्मिती करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच 'आदर्श - पंचवटी एक्सप्रेस' येवल्यात दाखल झाली. त्यावेळी गांधी यांनी तिथे जाऊन या गाडीची पाहणीदेखील केली होती. ही एक्सप्रेस आज नाशिक रोड रेल्वे स्थानकात येणार असल्यानं खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते. यावेळी गांधीदेखील उपस्थित होते. मात्र रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस पोहोचण्याआधीच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.