अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरूच
By admin | Published: May 26, 2015 01:30 AM2015-05-26T01:30:21+5:302015-05-26T01:32:51+5:30
अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरूच
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ६ जूनला होण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने उद्या (दि.२६) विशेष बैठकीची अधिसूचना निघण्याची चिन्हे आहेत. या आठवड्यातच बैठकीबाबत अधिसूचना निघणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, अध्यक्ष पदासाठी आवश्यक असलेले ११ संचालकांचे संख्याबळ हिरे आणि कोकाटे-पिंगळे गटाकडे कालपर्यंत (दि.२५) जमले नसल्याची चर्चा असून, पाच संचालकांचा दबावगट तयार होण्याची चिन्हे आहेत. या सर्व घडामोडीत जिल्हा परिषदेतून निवडून गेलेल्या दोन संचालकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.
सोमवारी याबाबतची अधिसूचना निघण्याची शक्यता होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उप सहनिबंधक सतीश खरे यांची काल तब्येत बिघडल्याने त्याबाबत अधिसूचना निघू शकली नसल्याचे समजते. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची संख्या २१ असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयासाठी ११ संचालकांची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. हिरे गटाने त्यांच्याकडे १३ ते १४ संचालक असल्याचा दावा केला असला तरी या संचालकांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे हिरे गटाकडे नेमके किती संचालकांचे ‘पाठबळ’ आहे, याची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यातच कोकाटे-पिंगळे गटाकडून कालही संचालकांची जमवा जमव सुरूच असल्याचे चित्र होते. अपक्ष म्हणून निवडून आलेले जि. प. सभापती केदा अहेर, सदस्य अॅड. संदीप गुळवे यांच्यासह नामेदव हलकंदर, सचिन सावंत व धनंजय पवार यांचा एक दबावगट तयार होेण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेचे आमदार अनिल कदम व सुहास कांदे या संचालक जोडीने अद्यापही ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतल्याने अध्यक्षपदाची चुरस वाढली आहे. (प्रतिनिधी)