प्रेस अधिकारी, कामगार देणार केरळला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:17 AM2018-08-26T00:17:53+5:302018-08-26T00:18:18+5:30
केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिकरोड : केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केरळ राज्यात गेल्या पंधरवड्यात अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पुरामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून अजूनही काही भागातील पाणी हळूहळू ओसरत आहे. पाऊस व पुरामुळे सर्वस्व वाहून गेल्याने मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळच्या पूरग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयासह महामंडळाच्या नऊ युनिटमधील अधिकारी, कामगारांच्या एक दिवसाचे वेतन केरळ मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रणालय महामंडळाचे अपर महाप्रबंधक बी. जे. गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वीच नऊ युनिट प्रबंधकांना याबाबत पत्र पाठविले आहे. भारत प्रतिभूती मुद्रणालयात २१२६, चलार्थपत्र मुद्रणालयात १९४५ व नऊ युनिट मिळून एकूण ६ हजार ५०० अधिकारी, कामगार आहेत. देशामध्ये नैसर्गिक आपत्ती, संकट आल्यावर मुद्रणालयातील कामगार नेहमी सर्व प्रकारच्या मदतीसाठी एकजुटीने आघाडीवर राहिले आहेत. प्रत्येकवेळी प्रेस कामगारांकडून मोठी मदत दिली जाते.