‘हायप्रोफाइल’ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: November 18, 2016 10:34 PM2016-11-18T22:34:04+5:302016-11-18T22:38:30+5:30
लक्षवेधी : गणेशपेठेतील लढत सिन्नर शहरवासीयांची उत्कंठा वाढविणारी; खरी लढत तिरंगीच
सिन्नर : शहरातील गणेशपेठ या व्यावसायिक भागापासून ते वावी वेस झोपडपट्टीपर्यंत विस्तारलेल्या प्रभाग ६ ब मध्ये हायप्रोफाइल उमेदवारांमुळे चुरशीची लढत होत आहे. प्रभाग ६ ब मध्ये या दिग्गज उमेदवारांमुळे पक्षाची व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे, भाजपाचे उमेदवार व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक युगेंद्र क्षत्रिय, कॉँग्रेसचे उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारूवाले या दिग्गजांसह मनसेचे कैलास दातीर व अपक्ष योगेश क्षत्रिय या प्रभागात आपले नशीब आजमावत आहेत.
हेमंत वाजे, युगेंद्र क्षत्रिय व मेहमूद दारूवाले असे हायप्रोफाइल व दिग्गज मैदानात असल्याने शहरवासीयांच्या नजरा या प्रभागाकडे लागून राहिल्या आहेत. निवडणूक रिंगणात प्रत्यक्षात पाच उमेदवार दिसत असले तरी खरी लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचे उमेदवार हेमंत वाजे हे आमदार राजाभाऊ वाजे यांचे चुलत चुलते आहेत. लायन्स क्लबसारख्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आदर्श कामे उभी केली आहेत. मातोश्री दिवंगत आमदार रुख्मिणीबाई वाजे यांचा लोकसेवेचा वारसा लाभलेल्या हेमंत वाजे यांच्यासाठी सदर निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे. वाजे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविलेले असल्याने त्यांना पालिका कामाचा अनुभव आहे. अतिशय सोज्वळ प्रतिमा असलेले व प्रत्येकाच्या मदतीला धावणाऱ्या हेमंत वाजे यांच्या उमेदवारीने आमदार वाजे यांच्यासह शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मनसेने कैलास दातीर यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी मनसेचे तालुका संघटक व मनसे मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. मनसेच्या विविध आंदोलनात त्यांचा सहभाग दिसून येतो. सामाजिक उपक्रमात ते दिसून येतात. अपक्ष उमेदवार योगेश क्षत्रिय यांनीही या प्रभागात दिग्गजांसमोर आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
प्रभाग ६ अ हा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. या प्रभागातून भाजपाच्या चैताली रामनाथ मोरे, शिवसेनेच्या विजया शरद बर्डे व कॉँग्रेसच्या अनिता उदय नाईक निवडणूक रिंगणात आहेत. (वार्ताहर)