प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार होणार ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:11 AM2021-07-24T04:11:31+5:302021-07-24T04:11:31+5:30

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एका वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार यंदा ऑनलाइन पद्धतीने वितरित केला जाणार आहे. ...

The prestigious 'Godavari Gaurav' award will be online | प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार होणार ऑनलाईन

प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार होणार ऑनलाईन

Next

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एका वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार यंदा ऑनलाइन पद्धतीने वितरित केला जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा २७ फेब्रुवारी २०२० चा गोदावरी गौरव पुरस्कार कोरोनाच्या परिस्थितीमुळे आणि निर्बंधांमुळे होऊ शकला नव्हता. आता हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक या फेसबुक पेजवरून रविवार दिनांक २५ जुलैला सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

प्रतिष्ठानच्या या सोहळ्यात श्रीगौरी सावंत (लोकसेवा), डॉक्टर माधव गाडगीळ (विज्ञान), भगवान रामपुरे (शिल्प), दर्शना जव्हेरी (नृत्य), सई परांजपे (चित्रपट) आणि काका पवार (क्रीडा) यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा एक वर्षाआड मोठ्या उत्साहाने पार पडत असतो. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचे मापदंड उभे करणाऱ्या आणि समाजाला समृद्ध करणाऱ्या या पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे मनोगत ऐकण्यासाठी रसिक देखील उत्सुक असतात. परंतु गतवर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे हा कार्यक्रम वेळेत होऊ शकला नव्हता.

कोट

हा कार्यक्रम निर्बंध शिथिल झाल्यानंतर परंपरेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर व्हावा, असेच प्रतिष्ठानला वाटत होते. त्यानुसार प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी तसे निर्देशही दिले होते. त्याप्रमाणे कार्यक्रमाची तयारीही करण्यात आली होती. परंतु नजीकचा काळ लक्षात घेता असा सोहळा प्रत्यक्ष आयोजित करणे शक्य होण्याची शक्यता प्रतिष्ठानला वाटत नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तशीच भावना पुरस्कारार्थींनीही व्यक्त केल्याने प्रतिष्ठानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला.

मकरंद हिंगणे, कार्यवाह, कुसुमाग्रज प्रतिष्ठान

Web Title: The prestigious 'Godavari Gaurav' award will be online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.