सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असुविधांचा पसारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 05:11 PM2020-01-15T17:11:18+5:302020-01-15T17:12:02+5:30
त्र्यंबकेश्वर : मुलींनी वाचला समस्यांचा पाढा, दुर्लक्षाबद्दल संताप
त्र्यंबकेश्वर : येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात असुविधांचा पसारा वाढत चालल्याचे सांगत एकेक समस्यांचा पाढा वसतिगृहातील विदयार्थिनींनी पत्रकारांसमोर बोलताना वाचला. कडाक्याच्या थंडीतही मुलींना थंडगार पाण्याने स्नान करावे लागते, वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहात अंधार असतो अशा एक ना अनेक तक्रारी करत मुलींनी सामाजिक न्याय विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या नाशिक सामाजिक न्याय विभागाचे त्र्यंबकेश्वर रिंगरोडवर मुलींसाठी वसतिगृह आहे. सदरचे वसतिगृह गावापासून दीड ते दोन कि.मी.अंतरावर एकांत जागी आहे . ही इमारत फक्त पुर्वेकडे बंदीस्त आहे. तर अन्य बाजू मोकळ्याच आहेत. मुलींचे वसतिगृह असूनही इमारतीला संरक्षण भिंत नाही. एकांत जागी असल्याने इमारतीत सर्पांचा वावर आहे. वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सर्व मुली माधवगिरी महाराजांच्या संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात पाणी पिण्यासाठी जात असतात. टॉयलेट बाथरु ममध्ये अंधार असतो. मध्यंतरी रात्री होस्टेलवर दगड येत असत. पोलीसांकडे तक्र ार केल्यावर पोलीसांनी गस्त सुरु केल्यामुळे लगेच दगडफेकीचा प्रकार बंद झाला. वॉर्डनकडे असलेले अधिकारही सीमित आहेत. त्यांच्या अधिकाराच्या पुढील कोणतेही काम करायला वरिष्ठांकडे अर्ज करावे लागतात. गरम पाण्यासाठी बंब करायचा आहे मात्र, चार महिन्यांपासून नाशिक कार्यालयात त्यासंबंधीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ऐन थंडीत मुलींना थंड पाण्याने स्नान करावे लागत आहे. एकीकडे मुलींसाठी शिक्षणाबाबत शासन अग्रेसर असताना शासनाच्याच विभागाकडून सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल मुलींनी संताप व्यक्त केला. यावेळी वसतिगृहाच्या वॉर्डन उपस्थित होत्या.