जनावरांमध्ये विषाणूजन्य लम्पी त्वचारोगाचा प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:18+5:302021-08-19T04:20:18+5:30
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, निफाड, मालेगाव तालुक्यांसह त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यामध्ये जनावरांमध्ये विषाणूजन्य लम्पी त्वचारोगाचा प्रसार होत असल्याचे ...
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, निफाड, मालेगाव तालुक्यांसह त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यामध्ये जनावरांमध्ये विषाणूजन्य लम्पी त्वचारोगाचा प्रसार होत असल्याचे समोर येत आहे. लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी पशूपालकांनी लक्षणे दिसून येताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचारासह जनावरांना लसीकरणही करून घेण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.
सध्या माणसांवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सावट असताना जिल्ह्यातील पशुधन लम्पी या त्वचा विषाणूच्या विळख्यात सापडले आहे. जिल्ह्यात इगतपुरी, मालेगाव, निफाड या जिल्ह्यात प्रामुख्याने संकरित व देशी गाय, म्हैस या जनावरांना या रोगाचा संसर्गाचा धोका उद्भवत असून सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्येही काही प्रमाणात या रोगाची बाधा झालेली जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून जनजागृती व लसीकरण करण्यात येत असून आजाराची लक्षणे आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिला आहे.
लम्पी रोगाची लक्षणे-
-जनावरांना प्रथम ताप येतो त्यामुळे दूध उत्पादनात घट होते.
-संक्रमित जनावराच्या नाकात व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात.
-जनावरांना पोट, पाठ, पाय, मान, डोके, तसेच शेपटीखाली त्वचेवर २ ते ५ सें.मी व्यासापर्यंतच्या कडक व गोलाकार गाठी येतात.
- रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या डोळ्यातून तसेच नाकातून स्राव होतो.
-गर्भधारणा अवस्थेतील जनावरांमध्ये गर्भपात होतो किंव्हा रोगट वासरे जन्मला येतात.
असा होतो लम्पीचा प्रसार
- लम्पीचा प्रसार बाधित जनावराच्या नाकातील स्त्राव, लाळ, मूत्र, दूध तसेच वीर्यातून इतर जनावरांना होतो.
- रोग पसरविणारे कीटक, डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फतही लम्पीचा प्रसार होतो.
- उष्ण व दमट वातावरणात या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो.
-दूषित चारा व पाणी सेवन केल्यास तसेच दूध पिणाऱ्या लहान वासरांना बाधित गाईंकडून संसर्ग होतो.
- ४ ते१४ दिवसांपर्यंत या रोगाचा संक्रमण कालावधी असतो.
-विषाणू रक्तामध्ये आढळतो नंतर शरीराच्या इतर भागात संक्रमण करतो.
खबरदारीचे उपाय-
-लक्षणे आढळून आल्यास बाधित जनावर तत्काळ इतर जनावरांपासून वेगळे करावे.
रोगाची लागण झालेल्या भागातील जनावरांची वाहतूक तसेच विक्री करू नये.
- रोगी जनावरे व निरोगी जनावरे एकत्र चराईसाठी सोडू नयेत.
-गोठ्यातील कीटकांचा त्वरित बंदोबस्त करावा.
- जनावरांचा गोठा कोरडा, स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावा.
लम्पीने जनावर दगावल्यास ८ ते १० फूट खोल खड्ड्यात पुरावे.