‘फेक न्यूज’ रोखण्यासाठी समाजामध्ये लोकजागृतीची गरज : फैझ उल्लाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:28 AM2018-12-22T01:28:09+5:302018-12-22T01:28:38+5:30
आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे, सामाजिक जबाबदारी, देशभावना आणि विचारसरणी दाखविण्याच्या उद्देशाने बहुतांश लोक आलेले मेसेज इतराना पाठवितात व येथूनच फेक न्यूजला सुरुवात होते.
नाशिक : आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे, सामाजिक जबाबदारी, देशभावना आणि विचारसरणी दाखविण्याच्या उद्देशाने बहुतांश लोक आलेले मेसेज इतराना पाठवितात व येथूनच फेक न्यूजला सुरुवात होते. या फेक न्यूज रोखण्यासाठी समाजामध्ये लोकजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक फैझ उल्लाह यांनी केले़ कुसुमाग्रज स्मारक येथे सुरू असलेल्या ७व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘चॅलेंजेस आॅफ फेक न्यूज’ यावर विषयावर ते बोलत होते.
उल्लाह यांनी सांगितले की, फेक न्यूज हा तीस वर्षे जुना प्रकार असून, असत्य गोष्टीला सत्यतेचा बुरखा घालून फेक न्यूज बनवली जाते. प्रारंभी छोट्या स्वरूपात सुरू झाली ही न्यूजचा प्रवास कालांतराने मोठ्या प्रमाणात पसरला़ माध्यमांच्या वाढत्या प्रमाणाकडे पाहत शब्द, चित्र आणि व्हिडीओ या तीन स्वरूपात फेक न्यूज पाहायला मिळतात़ काही महिन्यांपूर्वी मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या मेसेजमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. मुळात जनजागृतीसाठी वापरण्यात आलेला हा पाकिस्तानमधला व्हिडीओ होता़ मात्र, तो सर्वप्रथम चोरला व अफवेच्या उद्देशाने संकलित केला व देशभर त्याच प्रसार करण्यात आला़
विविध विषयांवरील फिल्मसचे सादरीकरण
पहिल्या सत्रात अंडरलाइन, मॉ, बाटली या फिल्मस दाखविण्यात आल्या़ अंडरलाइनमध्ये लिंग भेदावर, मॉमधून आईचे प्रेम तर बाटली या फिल्ममधून दारूच्या आहारी जाणाºयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला़ यावेळी मोठ्या स्वप्नावर आधारित अॅनिमेटपट दाखवला गेला. दुसºया सत्रात ‘नताशा’ या फिल्ममध्ये देहव्यापारात ढकलण्यात आलेल्या मुलीची कथा तर ‘द ट्रकन अप्पल’ने सुरक्षित वाहन चालविण्याबाबत भाष्य केले. यावेळी टाइम, डब्बा गुल्ल, स्टील सिटी, इनस्त्रा स्टोरी, एस टी ७०, बीलव्हड, लडाख चले रिक्षावाला या फिल्म्स दाखविण्यात आल्या.