भुर्दंड टाळण्यासाठी एजंटांचे अधिकाऱ्यांना साकडे
By Admin | Published: May 31, 2016 10:44 PM2016-05-31T22:44:57+5:302016-05-31T22:49:05+5:30
भुर्दंड टाळण्यासाठी एजंटांचे अधिकाऱ्यांना साकडे
नाशिक : भारतीय टपाल खात्याच्या संकेतस्थळावरील विशिष्ट लिंक बिघाडामुळे बंद असल्याने नियमित आरडी खाते असणाऱ्या अल्पबचत प्रतिनिधींना दंडाचा भुर्दंड लावण्याच्या प्रकारांना विरोध करण्यासाठी एजंट एकवटले असून, सोमवारी त्यांनी सहायक प्रबंधकांची भेट घेतली आणि अडचणी मांडल्या आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून टपाल खात्याच्या संकेतस्थळावर एजंट म्हणजेच अल्पबचत प्रतिनिधींना गुंतवणूकदारांची माहिती भरावी लागते. त्यानंतर त्याची प्रिंट काढून गुंतवणुकीच्या रकमेसह ती संबंधित टपाल कार्यालयात द्यावी लागते; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून लिंकमध्ये तांत्रिक बिघाड दाखविला जात असून, त्यामुळे प्रतिनिधींना ही रक्कम भरता आलेली नाही. दरम्यान, आता ही रक्कम भरण्यासाठी जाणाऱ्या अल्पबचत प्रतिनिधींना विलंबाने रकमेचा भरणा केल्याबद्दल दंड आकारला जात आहे.
यासंदर्भात सहायक प्रबंधक कुलकर्णी यांची अल्पबचत प्रतिनिधींनी भेट घेतली; परंतु त्यातून आणखीच गोंधळ वाढला आहे. आता एक्सेल शीटमध्ये अल्प बचत गुंतवणूक करणाऱ्यांची यादी भरून द्या, असे त्यांनी सांगितले आहे; परंतु शहरातील अन्य टपाल खात्यांकडून दुपारपर्यंत अशा प्रकारच्या एक्सेल शीट पेनड्राईव्हमध्ये देण्यात आलेले नाही.
मुख्य टपाल कार्यालयातून पाठविण्यात येत असलेल्या ई-मेल संदेशांचे संबंधित टपाल कार्यालयेही वाचत नसल्याचे स्पष्ट झाले असून, आता मंगळवारी महिना संपल्यानंतर दंड कसा टाळता येईल, या संभ्रमात अल्पबचत प्रतिनिधी आहेत.