सटाण्यात घुसखोरी करणारे लोंढे रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:30 PM2020-04-13T22:30:53+5:302020-04-13T23:06:15+5:30
मालेगावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर त्याचा शिरकाव अन्य भागात होऊ नये म्हणून सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असलातरी रात्री-पहाटेची वेळ साधून माणसांचे लोंढे मालेगावकडून सटाण्याकडे येत असल्याचे उघडकीस आले आहे.
सटाणा : मालेगावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर त्याचा शिरकाव अन्य भागात होऊ नये म्हणून सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असलातरी रात्री-पहाटेची वेळ साधून माणसांचे लोंढे मालेगावकडून सटाण्याकडे येत असल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी (दि.१३) सकाळी शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन महिलांसह दहा जणांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला. नागरिकांना या लोकांना अडवून पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, पोलिसांनी मालेगावच्या या दहा जणांची सटाणा ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय तपासणी करून मालेगावला रवानगी करण्यात आली.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेगावला लागून असलेल्या सर्वच सीमा बंद करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले होते. सीमाबंदीचे आदेश देऊनही बागलाणच्या लखमापूर, वायगाव, अंबासन, ठेंगोडा येथून रात्री-पहाटेच्या सुमारास लोंढेच्या लोंढे बागलाणमध्ये राजरोस घुसत असल्याचे वेळोवेळी नागरिकांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून मालेगावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर प्रशासनाने मालेगाव शहर पूर्णपणे चारही बाजूने सील करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले, असे असताना बागलाणमध्ये आजही ग्रामीण भागातील आडमार्गाने मालेगावातील लोंढे पायी मार्गक्र मण करताना दिसून येत आहेत. सोमवारी (दि. १३) सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान शहरातील आराई फाट्यावरील नागरिकांना काही लोंढे मालेगावकडून सटाण्याकडे येताना दिसले. काही लोंढे शहरात पसार होण्यास यशस्वी झाले तर दोन महिलांसह दहा जणांना अडविण्यात नागरिक यशस्वी झाले. नगरसेवक आबा सोनवणे, नितीन सोनवणे, दगा बापू सोनवणे यांनी तत्काळ सटाणा पोलिसांशी संपर्क साधून घुसखोरी बद्दल माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी सर्वांची विचारपूस करून त्यांना रुग्णवाहिकेतून सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांची रवानगी मालेगावला करण्यात आली. कोरोनामुळे भेदरलेल्या मालेगावचे लोंढे बागलाणमध्ये घुसखोरी करत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
जिल्हा प्रशासनाने सीमाबंदीचे निर्देश दिले असतानाही बागलाणमध्ये खुलेआम घुसखोरी सुरू असल्याचे दिसून येते. तालुक्यात बाभूळणे, मानूर, चिराई घाट, अंबासन, वायगाव, लखमापूर, ठेंगोडा, डांगसौंदाणे येथे सीमाबंद करण्यात आल्या आहेत, असे असताना मालेगाव तसेच बाहेर गावच्या शेकडो लोकांची घुसखोरी आजही सुरू आहे. मालेगावातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी याबाबत अधिक दक्ष राहण्याची अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.