चोरट्या मार्गाने होणारी नायलॉन मांजाची वाहतूक रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:45 AM2021-01-10T00:45:54+5:302021-01-10T00:46:12+5:30
नाशिक : शहरात चोरट्या मार्गाने सिन्नरकडून एका अल्टो कारमधून नायलॉन मांजाचा साठा वाहून आणला जात असताना शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या दोन पथकांनी संशयित कार चेहडीजवळ पकडली.
नाशिक : शहरात चोरट्या मार्गाने सिन्नरकडून एका अल्टो कारमधून नायलॉन मांजाचा साठा वाहून आणला जात असताना शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या दोन पथकांनी संशयित कार चेहडीजवळ पकडली. या कारमधून नायलॉन मांजाचे सुमारे १११ गट्टू जप्त करत तिघा संशयितांना अटक केली.
गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी मध्यरात्री उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे, विशाल काठे, दिलीप मोंढे, फय्याज सय्यद, आसिफ तांबोळी, आदींचे दोन पथके तयार केली. एका पथकाने नाशिकरोड उड्डाणपुलाजवळ तर दुसऱ्या पथकाने शिंदे टोलनाक्याच्या परिसरात साध्या वेशात सापळे
रचले.
यावेळी संशयास्पद अल्टो कार (एम.एच.१५ अेएच ६३५३) येताना पथकाला दिसली. एका पथकाने टोलनाक्याच्या परिसरात कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता कारचालकाला संशय आल्याने तेथून त्याने कार वेगाने नाशिकरोडकडे धाडली; मात्र दुसऱ्या पथकाने तत्काळ सावध होत शिताफीने सिनेस्टाइल ही कार नाशिकरोड उड्डाणपुलाच्या अलीकडे रोखली.
यावेळी कारमधून संशयित करण दीपक बत्ताशे (२२, रा. द्वारका), अक्षय रवींद्र लोंढे (२५, रा. लोंढे गल्ली, सिन्नर), साहील सुनील बागडे (१९, रा. द्वारका) यांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता डिक्कीतून ६६ हजार ६०० रुपयांचे नायलॉन मांजाचे १११ गट्टूंचा साठा मिळून आला. याप्रकरणी तिघांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार व नायलॉन मांजाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
नायलॉन मांजा जप्तीच्या कारवाईमध्ये या पथकाने आतापर्यंत १ लाख ८० हजार रुपये किमतीचा सुमारे ३३१ गट्टूंचा साठा जप्त केला आहे.