साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:47+5:302021-06-28T04:11:47+5:30
नाशिक : भारतात उसापासून गूळ तयार करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून प्रचलित आहे. साखरेपेक्षाही आधी गुळाचे उत्पादन होत असल्याचा ...
नाशिक : भारतात उसापासून गूळ तयार करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून प्रचलित आहे. साखरेपेक्षाही आधी गुळाचे उत्पादन होत असल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. अद्यापही देशातील एकूण ऊस उत्पादनापैकी सुमारे ४० ते ५० टक्के ऊस हा गूळ उत्पादनासाठी वापरला जातो. साखर कारखाने उभे राहिल्यानंतर उसापासून गूळ तयार करण्याचा व्यवसाय मंदावला. पूर्वी अनेक लोक वैयक्तिक स्तरावर गुऱ्हाळ चालवित असता त्यानंतर काही ठिकाणी सहकारी संस्थांमार्फत गुळाचे उत्पादन केले जाते. राज्यात कोपरगाव, श्रीरामपूर, बारामती व कोल्हापूर आदी ठिकाणी गूळ उत्पादनाची मोठी केंद्रे आहेत. सुरुवातीच्या काळात भारतात अनेक नागरिकांची गुळाला पसंती असे; पण ६०-७० च्या दशकानंतर गुळाची मागणी कमी होऊन साखरेला अधिक पसंती मिळू लागली. यामुळे गुळाच्या व्यवसायावर काहीसा परिणाम झाला. साखरेचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागल्यानंतर आता अनेक नागरिक पुन्हा गुळाकडे वळू लागल्याने सध्या बाजारात गूळ साखरेपेक्षा अधिक भाव खाऊ लागला असल्याचे दिसते. त्या काळात गूळ म्हणजे गरिबांचे अन्न तर साखर वापरणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते. बदलत्या काळानुसार परिस्थिती बदलली असून आता साखरेपेक्षाही गूळ महागला आहे. तरीही अनेक लोक गुळालाच अधिक पसंती देत असल्याचे दिसते.
चौकट-
गुळाचा चहा बनले स्टेटस
पूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये गुळाचेच पदार्थ अधिक बनविले जायचे. अगदी दिवाळीचा फराळही गुळापासूनच होत होता. त्यात पौष्टिकता अधिक होती. लग्नसमारंभ, साखरपुडा, दशक्रिया विधी आणि इतरही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेक गरीब लोक गुळाच्या लापशीलाच अधिक प्राधान्य देत असत. इतकेच नव्हे ते अनेक जुन्या पहिलवानांचे गूळ आणि शेंगदाणे हे प्रमुख खाद्य होते. इतकेच काय सकाळी सकाळी कामाला निघणारे कामगारही खिशात गूळ आणि शेंगदाणे घेऊन घराबाहेर पडत असत. कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तेवढे शेंगदाणे आणि गूळ संपवित असत. गुळाचा चहा दररोज व्हायचा. सणावाराला गुळाचे गुळवणी मंडळी पुरणपोळी कुस्करुन खात असत. साखर आल्यानंतर मात्र ती मजा गेली. गुळाची जागा साखरेने घेतली अन् गुळाच्या लापशीची जागा साखर शिऱ्याने घेतली. आता पुन्हा दिवस पालटले आहेत. अनेक नागरिक आरोग्याबाबत विशेष जागरुक झाले असून गुळाच्या चहालाच अधिक पसंती देऊ लागले आहेत. अनेक ठिकाणी तर गुळाच्या चहाची हॉटेल्स सुरु झाली आहेत.
कोट-
प्रकृतीसाठी गूळ चांगला
साखर तयार करताना खूप प्रक्रिया केल्या जातात. त्या तुलनेत गुळावर कमी प्रक्रिया होत असल्याने गुळात मिनरल्स, खनिज लोह हे पदार्थ टिकून राहतात. गुळातून आपल्याला काही प्रमाणात आयर्नही मिळत असते त्यामुळे आरोग्यासाठी गूळ चांगला आहे. भारतीय संस्कृतीतही गुळाला महत्त्व आहे. पूर्वी कुणीही घरी आले तर त्यांना प्रथम गुळाचा खडा आणि पाणी देत असत ही आपली परंपरा आहे. - मीनल बाकरे- शिंपी, आहारतज्ज्ञ
शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी
कोट-
अनेक लोक आता गुळाच्या चहाकडे वळाले आहेत. ऑरगॅनिक टी, ग्रीन टी यांनाही पसंती मिळू लागली आहे. सध्या लाेणचे बनविण्यासाठीही गुळाचा वापर होत असल्याने गुळाला चांगली मागणी वाढली आहे. कोरोनाच्या काळात तर नागरिकांना गुळाचे विशेष महत्त्व पटले असल्याचे दिसून येते. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी
गावात मात्र साखरच !
कोट-
गुळापेक्षा साखर स्वस्त असल्याने ग्रामीण भागात गुळापेक्षा साखरेलाच अधिक पसंती दिली जाते. सध्या तर गूळ आणि साखरेच्या दरात सुमारे १५ रुपयांचा फरक आहे. सर्वसामान्य गोरगरिबांना ते परवडण्यासारखे असल्याने या भागात साखरेची अधिक विक्री होत असते. - विजय श्रीमाळी, किराणा व्यापारी