अखेर किराणा दुकानांत झळकले भावफलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:47 PM2020-04-20T22:47:28+5:302020-04-20T22:48:08+5:30
लॉकडाउन व संचारबंदीची संधी साधत येथील काही किराणा दुकानदार चढ्या दराने जीवनावश्यक मालाची विक्री करत होते. प्रशासनाने बैठक घेऊन ग्राहकांची लूटमार करू नका व दुकानाच्या दर्शनी भागात भावफलक लावण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या होत्या.
पिंपळगाव बसवंत : लॉकडाउन व संचारबंदीची संधी साधत येथील काही किराणा दुकानदार चढ्या दराने जीवनावश्यक मालाची विक्री करत होते. प्रशासनाने बैठक घेऊन ग्राहकांची लूटमार करू नका व दुकानाच्या दर्शनी भागात भावफलक लावण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या होत्या.
मात्र प्रशासनाच्या आदेशाला झुगारत दुकानदारांनी लूटमार सुरूच ठेवली होती. याबाबत सोमवारी (दि. २०) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासन जागे झाले. पुरवठा अधिकाºयांनी किराणा दुकानदार संघाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून सर्व किराणा दुकानांत भावफलक लावणे बंधनकारक आहे. भावफलक न लावणाºया व ग्राहकांची लूटमार करणाºया दुकानदारांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दम दिल्याने पिंपळगाव बसवंत परिसरातील छोट्या मोठ्या सर्वच किराणा दुकानांत भावफलकाच्या पाट्या झळकल्या.
आठ दिवसांपूर्वी किराणा दुकानदार लूट करत असल्याचे वृत्त ’लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने किराणा दुकानदारांना भावफलक लावण्याचे आदेश दिले होते. परंतु दुकानदारांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत भावफलक न लावता लूटमार सुरूच ठेवली
होती. याबाबत रविवारी पुन्हा वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे निफाडचे पुरवठा अधिकारी प्रकाश महाजन यांनी पिंपळगाव बसवंत येथील किराणा दुकानदार संघाचे अध्यक्ष यांची बैठक बोलावली. भावफलक न लावणाºया व चढ्या दराने मालाची विक्री करणाºया दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल असा दम
दिला.
बैठकीनंतर संघटनेची अध्यक्षांनी तातडीने दुुकानदारांना भाव फलकाच्या प्रती तयार करून सर्व किराणा दुकानांत लावण्यासाठी सांगितले व आम्ही प्रशासनाला सहकार्य करू, असे आश्वासन दिले. यावेळी निफाड पुरवठा अधिकारी प्रकाश महाजन, मंडल अधिकारी नीलकंठ उगले, तलाठी चंद्रकांत पंडित, किराणा दुकानदार संघाचे अध्यक्ष भरत छाजेड, राजू कायस्ते, मधू बनकर, रमेश वालेकर, बापू डेरे आदी उपस्थित होते.