इलेक्ट्रिकल बससाठी भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:28 AM2019-09-29T00:28:39+5:302019-09-29T00:28:58+5:30
महापालिकेने इलेक्ट्रिक बससाठी भाड्याच्या व्यतिरिक्त वीज बिलदेखील देण्याचा निर्णय आर्थिक तोटा वाढविणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे एका बससाठी दिवसाला १४०० रुपये खर्च होणार आहे.
नाशिक : महापालिकेने इलेक्ट्रिक बससाठी भाड्याच्या व्यतिरिक्त वीज बिलदेखील देण्याचा निर्णय आर्थिक तोटा वाढविणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे एका बससाठी दिवसाला १४०० रुपये खर्च होणार आहे. शहरात एकूण चारशे बस असणार आहेत. त्यामुळे महापालिकेला दिवसाकाठी एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा खर्च दैनंदिन खर्च अतिरिक्त करावा लागणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात बससेवा सुरू करण्याचा निर्णय गेल्यावर्षीच घेण्यात आला आहे. सुरुवातीला डिझेल आणि सीएनजी बस ठेकेदारामार्फत चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्या होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिकच्या बसदेखील घेण्याबाबत सुचविले. त्यामुळे महापालिकेने दोनशे इलेक्ट्रिकच्या बस वापरण्याचे ठरविले. त्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्यानंतर सलग तीन वेळा एकाच कंपनीने निविदा भरल्यानंतर महापालिकेने त्यासंदर्भात याच कंपनीकडे दरासाठी कमी जास्त करण्यासाठी प्रयत्न केले होते. विशेषत: आता केंद्र सरकारने इलेक्ट्रिक बससाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचादेखील वाटाघाटीसाठी आधार घेण्यात आले आहेत. यासंदर्भात कंपनीने दर पाठविताना अनुदान आणि वीज बिलाशिवाय दर दिले होते. त्यानुसार वीज बिल महापालिकेने भरल्यास ६२ रुपये दर दिला होता.
महापालिकेने ते मान्य केले असून आता इलेक्ट्रिक बस चालविताना प्रति किलोमीटर वीज दर महापालिका भरणार आहे. कोणतीही बस किमान २०० किलोमीटर धावणे गृहीत धरले आहे. त्याचा विचार केला तर दिवसाकाठी किमान १४०० रुपये खर्च येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले आहे. महापालिकेने दोनशे इलेक्ट्रिक बससाठी ग्रॉस रूट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. या दराव्यतिरिक्त एका बससाठी १४०० रुपये आणि २०० बसचा विचार केला तर प्रति दिन २ लाख ८० हजार असा खर्च करण्यात येणार आहे.
मनपा म्हणते, खर्च कमी होईल
ठेकेदाराने वीज बिलासह ७५ रुपये प्रति किलोमीटर असा दर दिला होता. तर विजेशिवाय ६२ रुपये दर दिला होता. महापालिका वीज बिल भरणार असली तरी १३ ऐवजी फक्त सात ते आठ रुपये प्रति युनिट खर्च येईल. त्यामुळे महापालिकेला खर्च कमी येईल हा खर्च १४०० रुपये प्रति बस असा दैनंदिन असेल. याशिवाय आता शासन सार्वजनिक बस वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस वापरल्यास वेगळ्या प्रकारचे दर लागू करण्याचे धोरण ठरवित असून त्यामुळे हे दर कमी अधिक होतील व महापालिकेला आर्थिक लाभ होईल, असे सूत्रांनी सांगितले.