फळभाज्यांचे भाव तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:47 PM2018-11-17T22:47:53+5:302018-11-18T00:20:04+5:30
वाढत्या थंडीचा परिणाम सर्वच प्र्रकारच्या फळभाज्यांवर होत असून, त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत फळभाज्यांची जवळपास २५ टक्क्यांपर्यंत आवक घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे
पंचवटी : वाढत्या थंडीचा परिणाम सर्वच प्र्रकारच्या फळभाज्यांवर होत असून, त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत फळभाज्यांची जवळपास २५ टक्क्यांपर्यंत आवक घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. पंधरवड्यापूर्वी दिवाळीचा सण असल्याने बाजार समितीत व्यापारी शेतमाल खरेदीसाठी नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवला होता. सणासुदीचे दिवस असल्याने शेतमालाची मागणी मोठ्या प्रमाणात घटलेली होती.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आवक कमी झाली असली तरी मागणी टिकून असल्याने व त्यातच सध्या थंडीची चाहूल लागल्याने अनेक ठिकाणी थंडीमुळे शेतातील उभ्या पिकांचा फुलोरा सुकून जात असल्यामुळे आवक घटली
आहे.
आवक घटल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवत असून, आगामी कालावधीत आवक आणखी घटली तर बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले आहे. पंधरवाड्यापूर्वी ३० रुपये प्रति जाळी दराने विक्री झालेल्या कारली जाळीला शुक्रवारी (दि.१६) बाजार समितीत २०० रुपये असा बाजारभाव मिळाला तर २० रुपये १८ नग दराने विक्री झालेल्या भोपळा मालाला १४० रुपये दर मिळाला. वांगे ५०० रुपये जाळी तर काकडी ६५० रुपये प्रति जाळी दराने विक्री होत आहे.
हिवाळा सुरू झाल्याने थंडीचा परिणाम पिकांवर जाणवत आहे. थंडीमुळे कारले, भोपळा व अन्य शेतमालाचा फुलोरा सुकून जात आहे त्यामुळे फुलोरा वाढत नाही परिणामी आवक घटली आहे.