कांदा रोपांचे भावही गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:24 PM2019-12-14T23:24:48+5:302019-12-15T01:00:09+5:30
मनोज बागुल। वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कांदा लागवडीला वेग आला असून, चालूवर्षी कांद्याला मिळालेल्या विक्र मी दरामुळे ...
मनोज बागुल।
वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कांदा लागवडीला वेग आला असून, चालूवर्षी कांद्याला मिळालेल्या विक्र मी दरामुळे यावर्षी कांदा रोपांचे दरही गगनाला भिडले आहेत. दुपटीने वाढलेले मजुरीचे दाम त्रासदायक ठरत आहेत. आहे तेवढी पुंजी काळ्या मातीत ओतताना शेतकरी दिसत आहेत. यावर्षी परिसरात गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्या मात्र वाढण्याची शक्यता आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील वटार, चौंधाणे, वीरगाव, विंचुरे, कंधाणे, डोंगरेज, केरसाणे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी केल्या जात असून, चालू वर्षी खराब हवामान व परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपांची मर झाली असून, तुटवडा निर्माण झाला आहे. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी असून, तेथील मजूर वर्ग ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेला असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मजूरटंचाई निर्माण झाली असून, प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत असून, तेही रोजंदारीवर न येता कंत्राटी पद्धतीने काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे तसेच मजुरीचे दरही वाढले आहेत. कांदा लागवडीसाठी २५० ते ३०० रु पये रोज असा दर झाला असून, बियाणे, खते आदींमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांनी रोपे मिळेल त्या दराने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे, परंतु शेतकऱ्यांना अधून-मधून पडणाºया ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी मोठ्या प्रमाणात करावी लागते. त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकºयांचा जीव टांगणीला लागतो. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कांदा रोपे कमी झाल्याने यावर्षी परिसरात गहू व हरभरा पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. येणाºया काळात गहू, हरभरा पिकाला सुगीचे दिवस येण्याचे चित्र परिसरात दिसत आहे. विहिरींच्या पाण्याची पातळी चांगली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, यावर्षी कांद्याच्या दराने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. परतीच्या पावसाने परिसरात एक महिना मुक्काम केल्यामुळे सर्व काही होत्याचं नव्हतं झालं. कांदा रोपे, मका, बाजरी सर्व पिके एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. उधार-उसनवारीने पैसा उपलब्ध करून कांदा रोपे टाकली; पण पावसाने रडीचा डाव खेळून हाताला घास हिरावून घेतला असे कांदा उत्पादक जिभाऊ खैरनार यांनी संगितले.