सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; नगरसेवकावर कारवाई
By admin | Published: July 10, 2016 01:32 AM2016-07-10T01:32:37+5:302016-07-10T01:35:32+5:30
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; नगरसेवकावर कारवाई
नाशिकरोड : गांधीनगर येथे सार्वजनिक मोकळ्या जागी दारू पिण्याच्या कारणावरून शिवसेना नगरसेवक शैलेश ढगे यांच्यासह तीन जणांवर उपनगर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
गांधीनगर भाजी बाजाराजवळील सार्वजनिक मोकळ्या जागेत शुक्रवारी रात्री एका युवकाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून गांधीनगर येथे काहीजण दारू पिऊन धांगडधिंगा व गोंधळ घालत असल्याचे कळविले. उपनगर पोलिसांना माहिती मिळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांधीनगर येथे त्या ठिकाणी धडक मारली. घटनास्थळावरून पोलिसांनी नगरसेवक शैलेश ढगे, योगेश झोपे, योगेश साळुंके, गिरीश चांदवडकर या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची बिटको रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम ११२, ११७ नुसार कारवाई करून ताकीद देत सोडून दिले. पोलिसांना घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, ग्लास आदि साहित्य मिळून आले नाही. (प्रतिनिधी)