टमाट्याचे भाव कडाडले
By Admin | Published: November 3, 2015 10:09 PM2015-11-03T22:09:00+5:302015-11-03T22:10:09+5:30
फटका : बेमोसमी पावसामुळे उत्पादनात घट
वणी : परराज्यात टमाट्याला मागणी वाढल्याने टमाट्याच्या दरात तेजीचे वातावरण असून, दर्जेदार टमाट्याला तब्बल तीस रु पये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याने टमाटा उत्पादकांच्या चेहऱ्यावर टमाट्याची लाली आली असून, उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मध्यंतरी झालेल्या वादळी पावसामुळे टमाटा पिकाचे दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एका दिवसात एकशेपंचवीस मिलीमीटर झालेल्या पावसाने ७० टक्के लागवड क्षेत्राची वाताहात झाली.
याबरोबर दाक्षिणात्य राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टमाटा उत्पादन घेण्यात येते, मात्र त्या ठिकाणीही पावसामुळे नुकसान झाले व सद्यस्थितीतही पाऊस सुरू असल्याने या पिकाचे नुकसान सुरूच आहे. दरम्यान अग्रमानांकित उत्पादन केंद्रांवर उत्पादनात प्रचंड घट आली असून, मागणी वाढली मात्र मागणी इतका पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. जिल्ह्यातून प्रतिदिन दोनशेपन्नास ट्रक टमाटा गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश मध्य प्रदेशाबरोबरच पाकिस्तानात जात आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या माध्यमातून होते आहे. शेतकरीवर्गाला समाधानकारक दर मिळत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दिवाळी सण तोंडावर आल्याने टमाटा उत्पादकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून, संलग्न व्यवसायाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)
पिंपळगावला ५०० रुपये जाळी
पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये टमाट्याच्या आवकेत घट झाली असून, रोज ६० ते ७० हजार जाळी आवक होत आहे. निर्यातक्षम टमाट्याला ५०० ते ७५० पर्यंत बाजारभाव मिळत आहे. सध्या भारतीय टमाट्याला दुबईत चांगली मागणी असल्याने व गेल्या तीन महिन्यांत बाजारभाव टिकून राहिले असल्याने यावर्षी टमाटा उत्पादकांंना दिवाळी चांगली जाणार आहे.