त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याने घंटा फेकून मारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 01:20 AM2021-09-11T01:20:17+5:302021-09-11T01:21:15+5:30
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजक व पुजारी यांच्यातील गर्भगृहातील वाद थेट त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने गावात तो चर्चेचा विषय झाला आहे. यात एका पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्यावर थेट घंटा फेकून मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजक व पुजारी यांच्यातील गर्भगृहातील वाद थेट त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने गावात तो चर्चेचा विषय झाला आहे. यात एका पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्यावर थेट घंटा फेकून मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात ७ सप्टेंबर रोजी मंदिराचे पूजक व पुजारी यांच्यात काही कारणावरून मंदिराच्या गर्भगृहात वाद झाला. वाद थेट त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. दोघांनीही एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिली. पुजारी कैलास देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, त्र्यंबकेश्वर मंदिरात माध्यान्ह कालची पूजा सुरू असताना पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी पूजेचे साहित्य अस्वच्छ असल्याचे सांगून शिवीगाळ करत थेट पुजेत वापरला जाणारा घंटा फेकून मारला असल्याचे म्हटले आहे. यावेळी देशमुख वाद नको म्हणून बाहेर निघून गेले असता शुक्ल यांनी पूजा सोडून पाठलाग करत बाहेर येऊन पुन्हा शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. तर पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कैलास देशमुख व त्यांची बहीण माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी देवस्थान ट्रस्टच्या कोठीत प्रवेश करत थेट चेअरमन यांच्याबाबत अपशब्द वापरले. देशमुख यांनी पूजेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी धार्मिक परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शुक्ल यांनी केला. दरम्यान, माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी सत्यप्रिय शुक्ल हे नेहमीच असे करतात. मागेही त्यांनी असाच एकास तांब्या फेकून मारला असल्याचे सांगत त्यांच्यावर या अगोदरही गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. आता या वादाप्रकरणी चेअरमन यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.