प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता मे महिन्यात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:28+5:302021-04-02T04:14:28+5:30
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजेच २५ एप्रिल रोजी प्राथमिक आणि माध्यमिक वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ...
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजेच २५ एप्रिल रोजी प्राथमिक आणि माध्यमिक वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कठोर करण्यात आल्यामुळे शाळांना ऑनलाईन माहिती प्रपत्र व आवेदनपत्र भरता आलेले नाहीत. ३१ मार्चअखेरची अंतिम मुदत संपुष्टात येईपर्यंत अनेक शाळांचे आवेदन भरणे बाकी राहिल्याने परिषदेकडून मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरलेले नाही, त्यांना येत्या १० एप्रिलपर्यंत प्रकिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलली परीक्षा
१- गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी, तत्पूर्वीच फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र शिक्षण परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा आटोपून घेतली होती.
२- गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद झालेल्या शाळा संपूर्ण वर्षभर सुरू होऊ शकल्या नाहीत. डिसेंबर महिन्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो अल्पजिवी ठरला.
३- यंदा फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना वाढू लागल्याने तसेच शाळा बंद असल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणे अवघड झाले होते. त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली.