राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साहित्याचा वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:45 PM2019-01-10T17:45:18+5:302019-01-10T17:46:20+5:30
येवला तालूक्यातील राजापूर येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते होऊन दोन महिने उलटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राला अद्याप डॉक्टर व दवाखान्यासाठी लागणारे साहीत्य उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राजापूर येथे आरोग्य केंद्राची इमारत लाखो रूपये खर्च करून उभारली, मात्र याठिकाणी सुविधांचा अभाव आहे. पिण्यासाठी पाणी नाही व रूग्णांना सुविधा मिळत नाही. आरोग्य केंद्राच्या या इमारतीची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा राजापूर, सोमठाणजोश पन्हाळसाठे, ममदापूर , खरवंडी, देवदरी व परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे . सध्या हिवाळा असल्याने थंडी जास्त प्रमाणात असल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात दिवसा खासगी डॉक्टर असतात परंतू रात्रीच्या वेळी डॉक्टर नसल्यामुळे रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. परिणामी रूग्णांना रात्रीच्या वेळी थेट येवला येथे जावे लागते. सध्या राजापूर व परिसरात दूष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी व मजूरांना कामे नाहीत, त्यात घरातील व्यक्ती आजारी पडल्यावर दवाखान्याला पैसे नसल्यामुळे अनेक गरिब रूग्ण दवाखान्यात न जाता घरीच अंगावर दूखणे काढण्याची वेळ गरिब शेतकरी व मंजूराची आली आहे .त्यामुळे राजापूर येथील आरोग्य केंद्राला कर्मचारी व सोयी सूविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशी मागणी शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, अशोक आव्हाड,बबन अलगट, भारत वाघ, लक्ष्मण घुगे, शंकर मगर, भाऊसाहेब बैरागी, राजेन्द्र वाघ ,गोकूळ वाघ, सागर अलगट, संजय कासार व ग्रामस्थांनी केली आहे.