प्राथमिक विद्यालय : पिण्याच्या पाण्यात डेंग्यूसदृश अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:20 AM2019-03-12T01:20:28+5:302019-03-12T01:20:53+5:30
मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यूसदृश अळ्या आढळून आल्याने शाळेला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
सिडको : मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यूसदृश अळ्या आढळून आल्याने शाळेला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
महापालिकेच्या सिडको मलेरिया विभागाच्या वतीने सोमवारी (दि.११) सकाळी संपूर्ण ताफ्यासह पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सिडको भागात महापालिकेच्या तसेच खासगी शाळांची संख्या अधिक असून, या शाळांमध्ये पाच वर्षे वयोगटापासून मुले शिक्षण घेत आहे. सिडकोतील मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालय असून, या विद्यालयात सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत शाळा भरत असून, या शाळेत असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्या या गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ केल्या नसल्याचे मनपाच्या मलेरिया विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या आदेशान्वये पिण्याच्या पाण्या साफ कराव्यात याबाबत शाळेला दोन वेळीस नोटीस दिल्या होत्या, परंतु यानंतरही शाळेने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सोमवारी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी त्यांच्या टिमने अचानक शाळेत पाहणी केली. यावेळी शाळेच्या गच्चीवर ठेवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्यात डेंग्यूसदृश आजारांच्या अळ्या आढळून आल्या. तसेच शाळेच्या आवारात असलेल्या सेफ्टी टॅँकवर असेलेला ढापा तुटलेला आढळून आला असून, यामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले असून, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाने सर्व पाहणी केल्यानंतर शाळेला तत्काळ पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला असून, पाणीपुरवठ्यांच्या टाक्या त्वरित स्वच्छ करण्याची तंबी शाळा व्यवस्थापकांना दिली.