प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा बॅँक शाखेत ठिय्या आंदोलन
By admin | Published: April 25, 2017 01:50 AM2017-04-25T01:50:33+5:302017-04-25T01:50:46+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तत्काळ वेतन उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले.
कळवण : जिल्ह्यातील इतर तालुक्यात शिक्षकांना फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात आले; मग कळवण तालुक्यातील शिक्षकांवर अन्याय का, असा सवाल करीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कळवण शहर शाखेत तत्काळ वेतन उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले.
या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो प्राथमिक शिक्षकांनी आपली वाहने रस्त्यावर पार्किंग केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची काहीकाळ कोंडी झाली होती. नोटाबंदीच्या घोषणेनंतर जिल्हा बँकेचे व्यवहार अडचणीत आले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकरी, नोकरदार वर्गालाही सहन करावा लागत आहे. यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचादेखील समावेश आहे. कळवण तालुक्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन जिल्हा बँकेकडून वितरित होत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे फेब्रुवारी, मार्च व एप्रिलचा शेवटचा आठवडा सुरु असल्याने जवळपास तीन महिन्यांचे वेतन थकल्याने शिक्षक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
घर कर्ज, वाहन कर्ज, मुलांच्या शिक्षणाची फी, खर्च तसेच घरखर्च असा करावा असा सवाल त्यांना सतावत आहे. शिक्षक सर्व बाजूंनी आर्थिक कोंडीत सापडले आहे. शिक्षकांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील शिक्षकांना फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात आले, मग कळवण तालुक्यातील शिक्षकांवर अन्याय का, असा सवाल करीत आज कळवण येथील शहर शाखेत तत्काळ वेतन उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शिक्षकांनीे अचानक बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. (वार्ताहर)