पंतप्रधान मोदी यांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:50+5:302021-05-21T04:16:50+5:30
देशातील कोरोनाची स्थिती आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कशा प्रकारे यंत्रणा राबविण्यात आली याबाबतची माहिती घेण्याबरोबरच काही सूचना करण्यासाठी पंतप्रधान ...
देशातील कोरोनाची स्थिती आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कशा प्रकारे यंत्रणा राबविण्यात आली याबाबतची माहिती घेण्याबरोबरच काही सूचना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकाऱ्यांचा या बैठकीत समावेश होता. नाशिकमधून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सहभाग घेतला. याविषयी मांढरे यांनी सांगितले की, ही आढावा बैठक नव्हती तर कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यांनी कशा प्रकारे नियोजन केले याबाबतची माहिती तसेच त्याबाबत देवाणघेवाण व्हावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. वेळेची मर्यादा लक्षात घेता पाच ते सहा जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या वतीने नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला.
या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी गूड प्रॅक्टिसेसबाबत मार्गदर्शन केले. गेल्या वर्षभरापासून या संकटाशी सामना करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मोदी यांनी यावेळी कौतुक केल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. या सर्व प्रयत्नांमुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असले तरी कोरोनाचा समूळ नायनाट होत नाही, तोपर्यंत सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे कायम ठेवाव्यात, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली.
आगामी तिसरा लाटेच्या दृष्टीने सर्वांनी तयारी करावी व संकट जसे अभूतपूर्व आहे, तसेच आपले कामही अभूतपूर्व राहील, असा प्रयत्न सर्वजणांनी करावा अशा सूचना मोदी यांनी करून मनोबल उंचवल्याचे मांढरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
---कोट--
ज्या गूड प्रॅक्टिसेसबाबत पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली त्या बहुतेक सर्व आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. त्यामध्ये जनतेचा सहभाग, आपत्कालीन कक्ष, पोस्ट कोविड केअर सेंटर, तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने समिती, यावर आपण अगोदरच काम सुरू केले आहे.
-- सुरज मांढरे, जिल्हाधिकारी.