'मोदी मोदी'चा गजर...; पंतप्रधानांच्या 'रोड शो'ने संचारला युवा महोत्सवात उत्साह
By दिनेश पाठक | Published: January 12, 2024 12:23 PM2024-01-12T12:23:40+5:302024-01-12T12:24:52+5:30
फक्त पंधरा मिनिटे चालला रोड शो, नंतर काळाराम मंदिरात दर्शनासाठी रवाना
नाशिक : वंदे मातरम, भारत मातेचा जयघोष, मोदी मोदीचा गजर...जिकडे तिकडे उंचावलेले हात...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी टिपण्यासाठी सुरू असलेली धडपड... रस्त्याच्या दुतर्फा असलेली प्रचंड गर्दी, फुलांची उधळण, एकाहून एक असा सरस कलाविष्कार असा अमाप उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला दिसला. पंतप्रधानांनी देखील हात उंचावून उपस्थितांना दाद दिली. युवा वर्गाचा उत्साह अधिक प्रमाणात दिसून आला. जवळपास एक लाख नागरिकांनी रोड शो ला हजेरी लावली.
मोदी यांच्या कार्यक्रमात बदल झाल्याने रोड शो आटोपता घ्यावा लागला. रोड शो फक्त पंधरा मिनिटे चालला. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी (दि.१२) सकाळी सव्वा दहा वाजता नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर झालेल्या रोड शोमुळे संपूर्ण वातावरण मोदीमय झाले. सकाळी अकरा वाजता रोड शो संपला.
मोदी यांचे वाहन सुरळीत पुढे चालण्यासाठी रस्त्यावर बॅरेकेटींग करण्यात आले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतर्गत रथातून बाहेर पडले. मोदींची एक झलक पाहण्यासाठी नाशिकवासिय आतुर दिसत होते. फुलांचा वर्षाव होत असताना पीएम मोदींनी सतत हात हलवत लोकांना अभिवादन केले. रोड शोसाठी पिंक सिटीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुरक्षेची जबाबदारी दोन हजारांहून अधिक पोलिसांनी घेतली. उत्तेजित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. रोड शो आटोपून पंतप्रधान मोदी रामकुंडावर रवाना झाले. तेथे त्यांनी काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेतले.
पाय ठेवायलाही जागा नाही
तटबंदीवर पाय ठेवायला जागा उरलेली नव्हती. जमलेल्या गर्दीतील प्रत्येकजण हे ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होता. पीएम मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपाचे प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे वाहनावर होते.