काळारामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन, भावार्थ रामायणाचे वाचन; भजनाचा घेतला आनंद
By संकेत शुक्ला | Published: January 12, 2024 02:06 PM2024-01-12T14:06:54+5:302024-01-12T14:07:45+5:30
पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील ८ व्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला.
स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पंतप्रधान मोदी यांचे अभिवादन
मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.