‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ रामलला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांचे उद्गार
By धनंजय रिसोडकर | Published: January 23, 2024 04:56 PM2024-01-23T16:56:09+5:302024-01-23T17:00:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भानोसे यांच्याकडे बघून ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ असे सांगितले.
धनंजय रिसोडकर,नाशिक : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होत असताना पंतप्रधानांना पूजा विधी सांगणाऱ्या प्रमुख ५ पुरोहितांमध्ये नाशिकच्या वेद शास्त्र संपन्न पुरोहित शांतारामशास्त्री भानोसे यांचा समावेश होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भानोसे यांच्याकडे बघून ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ असे सांगत पूजाविधीतील सर्व बाबींची साग्रसंगीत पूर्तता केल्याचे वेशासं भानोसे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ५३४ विशेष निमंत्रित मान्यवरांचा समावेश होता. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्ल यजुर्वेदाच्या प्रयाेगातील धार्मिक विधींनुसार करण्याचे निश्चित झाल्याने यजुर्वेदीय परंपरेतील तज्ज्ञांना अयोध्येत पाचारण करण्याचा निर्णय प्रधान आचार्य काशीचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित आणि गणेश्वरशास्त्री द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यानुसारच नाशिकच्या शांतारामशास्त्री भानोसे यांना पाचारण करण्यात आले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशभरातील केवळ २१ गुरुजींना ही संधी लाभली होती. त्यातही थेट गर्भगृहात पंतप्रधानांनजीक बसून पूजाविधीचा प्रयोग चालवण्याची संधी वे.शा.सं. भानोसे यांना लाभली होती. या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणातही पूजाविधीतील श्लोक उच्चारण माईकवरुन करताना दिसल्याने नाशिककरांचा ऊरदेखील अभिमानाने भरुन आला.