‘त्यांना’ पंतप्रधान म्हणाले, ‘थॅँक यू’!
By admin | Published: September 10, 2014 09:30 PM2014-09-10T21:30:51+5:302014-09-11T00:32:27+5:30
‘त्यांना’ पंतप्रधान म्हणाले, ‘थॅँक यू’!
नाशिक : देशाचे पंतप्रधान म्हटले की त्यांचा व्यस्त दिनक्रम, त्यांच्यावर रोजच्या रोज पडणारा समस्यांचा पाऊस, असंख्य निवेदने हे सारे डोळ्यांसमोर येते. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने पाठविलेल्या पत्राला उत्तर द्यायला त्यांना वेळ कोठून मिळणार, असाही विचार येतो; मात्र शहरातील एका आजीबार्इंना आलेल्या पत्राने हा विचार खोडून काढला आहे. या आजीबार्इंना दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नव्हे, तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पत्र पाठवून ‘थॅँक यू’ म्हटले आहे.
महात्मानगर येथील संध्या माधव वैद्य असे या आजींचे नाव आहे. महात्मानगर येथील भजनी मंडळाच्या त्या सदस्य आहेत. या मंडळाअंतर्गत परिसरातील ज्येष्ठ महिला एकत्र येऊन विविध उपक्रम राबवित असतात. रोजच्या जगण्यातले अनुभव एकमेकींशी ‘शेअर’ केले जातात. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करावे आणि अयोध्येतील वादग्रस्त जागेबद्दल त्यांना विधायक सूचना करावी, असा विषय या मंडळात निघाला. वैद्य यांनी पुढाकार घेऊन तसे पत्र तयार केले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविणारे भारतमातेचे मंदिर उभारून त्याला आठ धर्मांच्या आठ पाकळ्या दर्शविणाऱ्या वास्तूची निर्मिती करावी, अशी सूचना करणारे पत्र त्यांनी लिहून काढले. तत्पूर्वी, पंतप्रधान झाल्याबद्दल मोदींचे अभिनंदनही करण्यात आले. संबंधित वास्तू कशी असावी, याचा आराखडाही पत्रावर साकारण्यात आला. हे पत्र ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, ७, रेसकोर्स, नवी दिल्ली’ या पत्त्यावर वैद्य यांनी पाठवून दिले. कामाच्या एवढ्या धबडग्यात पंतप्रधान या पत्राची कशी दखल घेणार, असा प्रश्न यावेळी अनेकांनी उपस्थित केला; मात्र दोन महिन्यांनी पंतप्रधान निवासातून थेट वैद्य यांच्या नावाने पत्र दाखल झाले. त्यात मोदींनी वैद्य यांना त्यांच्या सूचनेबद्दल हिंदी व इंग्रजीत धन्यवाद दिले आहेत. तसेच त्यांची स्वाक्षरीही आहे. (प्रतिनिधी)