पंतप्रधान गुरुवारी साधणार जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 01:32 AM2021-05-17T01:32:04+5:302021-05-17T01:32:34+5:30
कोरोनाची गंभीर परिस्थिती असलेल्या देशातील ५६ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या गुरुवारी (दि.२०) संवाद साधणार असून त्यामध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचादेखील समावेश आहे.
नाशिक : कोरोनाची गंभीर परिस्थिती असलेल्या देशातील ५६ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या गुरुवारी (दि.२०) संवाद साधणार असून त्यामध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचादेखील समावेश आहे. देशातील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने केंद्राकडून प्रत्येक राज्याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार ॲक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त असलेलेल्या जिल्ह्यांचा आढावा थेट पंतप्रधान घेणार असून तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी ते ऑनलाईन संवाद साधणार आहेत. देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा सहभाग असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचादेखील समावेश आहे.
महाराष्ट्रासह केरळ, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, झारखंड तसेच ओडिसा या राज्यांमधील ५६ जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट संवाद साधणार आहेत. त्यामध्ये संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी होणार आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने सातत्याने प्रशासनाला या महामारीचा संघर्ष करावा लागत आहे. तेथील नियंत्रण आणि नियोजन तसेच वैद्यकीय बाबींचा आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतची तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.