पंतप्रधानांची सभा, आंदोलक कांदा उत्पादकांची पोलिसांकडून धरपकड, घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:30 AM2024-05-15T10:30:01+5:302024-05-15T10:31:23+5:30
मोदींची सभा संपेपर्यंत या लोकांना पोलीस स्टेशनमध्येच स्थानबद्ध करून करण्यात येईल असे समजते.
- शेखर देसाई
लासलगाव ( नाशिक) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेसाठी निघालेल्या त्रस्त कांदा उत्पादकांचे प्रतिनिधीनी कांद्याच्या माळा घालून कांदा निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेतले.
पंतप्रधान यांची बुधवारी दुपारी सभा आहे. कांदा उत्पादकांचा रोष लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, डॉ. सुजित गुंजाळ, शिवा सुराशे, डॉ. विकास चांदर , विकास रायते ,, महेश होळकर, संतोष पानगव्हाणे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील ,भरत होळकर, राहुल शेजवळ,मयूर बोरा यांच्यासह दहा ते बारा जणांना लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब खंडाळ यांनी पोलीस कर्मचारी सुजित बारगळ यांच्यासह साध्य वेशातल्या पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणले आहे.
मोदींची सभा संपेपर्यंत या लोकांना पोलीस स्टेशनमध्येच स्थानबद्ध करून करण्यात येईल असे समजते. दरम्यान लासलगाव पोलीस स्टेशनने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनाही प्रतिबंधात्मक नोटीसा दिल्याची माहिती हाती आली आहे.