शिक्षक वेतनवाढीसाठी मुख्याध्यापकांचेच प्रमाणपत्र महत्त्वाचे
By admin | Published: June 20, 2017 06:22 PM2017-06-20T18:22:53+5:302017-06-20T18:22:53+5:30
उपसंचालकांचे स्पष्टीकरण: शाळा समितीच्या ठरावाची गरज नसल्याचा निर्वाळा
पाथर्डीफाटा : अनुदानित प्राथमिक - माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांची १ जुलै रोजी देय असलेली वेतनवाढ केवळ मुख्याध्यापकांच्या प्रमाणपत्राच्या आधारे देता येते, त्यासाठी संस्था किंवा शाळा समितीचा ठराव किंवा प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पत्राद्वारे दिले आहे. तशी सूचना जाधव यांनी वेतन पथकाला पत्र पाठवून केली आहे. एक वर्षाची निर्दोष सेवा पूर्ण करणाऱ्या सर्व शालेय कर्मचाऱ्यांना १ जुलै रोजी नियमित वेतनवाढ दिली जाते. केवळ मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक असते. मात्र काही संस्था व शाळा काही कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने संस्था व शाळा समितीच्या ठराव व प्रमाणपत्राच्या आवश्यकता सांगितली जात असून, त्याआधारे वेतनवाढ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्र ारी शिक्षण उपसंचालक व शिक्षक संघटनांकडे करण्यात आल्या होत्या. वेतनपथकही काहीवेळा काही प्रकरणांमध्ये अशी अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता वाघेपाटील व धुळे जिल्हाध्यक्ष भरतसिंह भदोरिया यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना लेखी तक्र ार देऊन स्पष्टीकरणाची मागणी केली. त्याआधारे शिक्षण उपसंचालकांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.