द्वारका येथे जुगार अड्ड्यावर छापा
By admin | Published: May 26, 2016 11:07 PM2016-05-26T23:07:30+5:302016-05-27T00:04:13+5:30
चार संशयितांना अटक : दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या द्वारका भागात अवैधरीत्या सुरू असलेल्या व्हिडीओ गेम व जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत दोन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर (बॉल गेम) पोलीस कर्मचाऱ्यांसह संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी पोलिसांनी चार संशयितांसह काही रोकड, भ्रमणध्वनी असा एकूण दोन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविषयी पोलीस ठाणे अनभिज्ञ असून पोलीस उपआयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन परिमंडळ दोनच्या पथकासह छापा मारला. याबाबत रात्री उशिरापर्यंत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. परिमंडळ दोनचे उपआयुक्त धिवरे यांच्याकडे सध्या परिमंडळ एकचीदेखील धुरा आहे. एन. अंबिका यांच्या बदलीनंतर अद्याप परिमंडळ एकला नवीन पोलीस उपआयुक्त लाभलेले नाही. धिवरे यांनी स्वत:च्या पोलीस पथकासोबत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे उद्ध्वस्त करत धाडसत्र सुरू केले आहे. (प्रतिनिधी)