Coronavirus: शासकीय मुद्रणालयात नोटांची छपाई बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 11:58 PM2020-03-22T23:58:08+5:302020-03-23T08:51:01+5:30
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेऊन केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनादेखील दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, संपूर्ण राज्यामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयात दोन्ही पाळ्यांमध्ये १९०० कामगार काम करतात. तर जेलरोड येथील चलार्थ पत्र मुद्रणालयात दोन्ही पाळ्यांमध्ये २१०० कामगार काम करतात.
सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या कारणास्तव मजदूर संघाने व्यवस्थापनाकडे दोन्ही मुद्रणालये बंद ठेवण्याची मागणी केली होती. मुद्रणालय व्यवस्थापनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मुद्रणालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी सांगितले. मुद्रणालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेस बंद ठेवण्याची वेळ आली आहे.